महाराष्ट्र

शिवसैनिकाचा खून

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

16 July :- बुधवारी रात्री दुचाकीवरून जाणाऱ्या दोघांना टेम्पोने मागून धडक दिली. यामध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला तर आणखी एक व्यक्ती जखमी आहे. सतीश नारायण क्षीरसागर असे मृत तरुणाचे नाव असून त्याचा मित्र विजय नागनाथ सरवदे हा गंभीर जखमी आहे. मृत व्यक्ती शिवसेनेचा कार्यकर्ता असून राजकीय पूर्ववैमनस्यातून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्याची हत्या केल्याचा आरोप मृताच्या नातेवाईकांनी केलाय.या प्रकरणात भय्या अवसले, संतोष सुरवसे, रोहित उर्फ अण्णा फडतरे, पिंटू सुरवसे अशा चार जणांवर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपी संतोष सुरवसे हे राष्ट्रवादीच्या माजी नगराध्यक्षा सरिता सुरवसे यांचे पती आहेत. मृत सतीश क्षीरसागर आणि जखमी विजय सरवदे यांनी मोहोळ नगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने वार्ड क्रमांक 8 आणि 9 च्या मतदारयादीत बोगस नावे नोंदविल्याची तक्रार तहसीलदारांकडे केली होती. या प्रकरणात प्रांताधिकाऱ्यांनी चौकशी करुन बोगस नावे वगळण्याचे आदेश दिले होते. रमाई घरकूल आवास योजनेच्या 28 मंजूर फाईल देखील गायब झाल्या होत्या. या प्रकरणात देखील शिवसेनेच्या वतीने सतीश क्षीरसागर आणि विजय सरवदे यांनी आंदोलन केले होते.

या प्रकरणावरुनच आरोपी हे दोघांवर चिडून होते. बुधवारी टेम्पो चालक भैय्या असवले यांने मी नवीन गाडी खरेदी केली आहे. त्याची पार्टी द्यायची आहे असे सांगून बोलावून घेतले. सतीश आणि विजय हे दोघे दुचाकीवरुन पुढे जात असताना टेम्पोने मागून जोरदार धडक दिली. धडक दिल्यानंतर जवळपास 200 मीटर पर्यंत फरपटत देखील नेले. त्यामुळे हा अपघात नसून घातपास असल्याची तक्रार मृताच्या नातेवाईकांनी पोलिसात दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असता तक्रारीत तथ्य असल्याचे प्राथमिक तपासातून समोर आले आहे. त्यामुळे गाडी चालकासहित चौघांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती अपर पोलिस अधीक्षक अतुल झेंडे यांनी दिली.

दरम्यान या प्रकरणात आरोपी टेम्पो चालकास पोलिसांनी अटक केली आहे तर इतर तीन आरोपींचा शोध पोलिसांमार्फत सुरु आहे. दरम्यान माझा भाऊ हा शिवसैनिक होता, राजकीय वादातूनच त्याची हत्या करण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांनी शिवसैनिकाला न्याय मिळवून द्यावा अशी विनंती मृताचे भाऊ सिद्धार्थ पवार यांनी केली आहे. सदरील घटना सोलापुरातील मोहोळमध्ये घडली आहे.