गेवराई तहसील कार्यालयाचा कारभार वार्यावर..
गेवराई, – तहसील कार्यालयाला कोणी वाली राहीला नाही, त्यामुळे या कार्यालयाची अवस्था म्हणजे असून अडचण नसून खोळंबा झाली आहे. कर्मचारी व अधिकार्यांसाठी वेळेचे बंधन राहीलेले नाही. अनेक कर्मचार्यांना कार्यालयात यायला साडे अकरा वाजतात तर काही कर्मचारी बीड हून आरामशीर ये-जा करत असल्याने ग्रामीण भागातून येणाऱ्या नागरिकांना त्रास होऊ लागला असल्याचे आमचे पत्रकार सुभाष मुळे यांना सांगितले आहे.
गेवराईचे तहसीलदार धोंडिबा गायकवाड सक्तीच्या रजेवर गेले असल्याची चर्चा असून, त्यांच्या कार्यकाळात तहसील कार्यालयाचा कारभार पुर्णपणे ढासळला होता. तहसीलदारांचा भ्रमणध्वनी बंद असायचा, एकाही नागरीकांना ते फोनवर बोलत नसत. कार्यालयात कधीही यायचे जायचे, त्यामुळे कर्मचारी व अधिकार्यांचे फावले. काही कर्मचारी बीडहून अपडाऊन करतात. काही महीला कर्मचारी साडे अकरा वाजता तहसिल कार्यालयात येताना दिसत आहे. टेबलवर काम करायचे सोडून मोबाईलवर अपडेट राहत असल्याने, ग्रामीण भागातील जनतेला अडचणी येत आहेत, गेल्या काही दिवसांपासून तहसील कार्यालयाचा कारभार रामभरोसे आहे. पुरवठा विभागाचे नायब तहसीलदार भंडारे यांना धान्य घोटाळा प्रकरणात अटक करण्यात आली. त्यांना जामीन मंजूर करण्यात आला असला तरी ते कार्यालयात येत नाहीत. प्रशांत जाधवर महसूल विभाग सांभाळून कार्यालयीन कामांना वेळ देतात. जोशी नावाचे नायब तहसीलदार बीडहून कारभार हाकत आहेत. दरम्यान त्यांना येथे काम करण्यात इन्ट्रेस्ट नसल्याची चर्चा आहे.
वाळू आणि राशन वाटप प्रकरणात तहसील कार्यालय बदनाम झाले असून अनेक अधिकारी व कर्मचारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या रडारवर आहेत. दरम्यान, शेतकऱ्यांना तहसील कार्यालयात अडचणी येत आहेत. बॅन्क कार्यालयासाठी लागणारी कागदपत्रे तहसील मधून वेळेवर मिळत नसल्याने, कोरोना सारख्या आजाराला रोखण्यासाठी सरकारच्या सूचनांचे पालन होत नाही. मंगळवार पासून नागरिकांनी तहसील कार्यालयात गर्दी केली आहे. त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी सक्षम अधिकारी व कर्मचारी नाहीत, जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने गेवराई तहसील कार्यालयाचा कारभार सुरुळीत करावा अशी मागणी होऊ लागली आहे.