बीड

शेतीच्या वादातून झालेल्या मारहाणीत महिलेचा गर्भपात

सोशल मीडियावर व्हिडिओ होतोय व्हायरल

30 April :- आज सकाळी औरंगाबाद शहरातील जटवाड्यात एक भयानक दृश्य पाहायला मिळालं आहे. याठिकाणी शेत जमिनीच्या वादातून दोन गटात झालेल्या बाचाबाचीनंतर एका महिलेवर काही हल्लेखोरांनी जीवघेणा हल्ला केला आहे. या हल्ल्यातील संबंधित महिलेचा गर्भपातही झाल्याचा आरोप केला जात आहे. संबंधित घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होतं असून अनेकजण संताप व्यक्त करत आहेत.

औरंगाबादच्या जटवाडा याठिकाणी शेतीच्या वादातून दोन गटात तुंबळ हाणामारी झाली आहे. सुरुवातीला बाचाबाची झाल्यानंतर अचानक या घटनेचं रुपांतर मारहाणीत झालं आहे. या मारहाणीत एका महिलेला जबरी मारहाण करण्यात आली असून या दुर्दैवी घटनेत तिचा गर्भपात झाल्याचा आरोप पीडित महिलेच्या पतीनं केला आहे. संबंधित महिलेवर शहरातील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी दोन्ही गटांनी एकमेकांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेची माहिती मिळताच दौलताबाद पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन वातावरण शांत करण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचबरोबर या घटनेशी संबंधित असणाऱ्या काही आरोपींना देखील पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. या घटनेत नेमक्या किती लोकांना दुखापत झाली याची माहिती समोर आली नाही. पण एका महिलेवर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे.

या मारहाणीबाबत मेडिकल अहवालाच्या अद्याप प्रतीक्षेत आहे. मेडिकल अहवाल समोर आल्यानंतर बऱ्याच गोष्टी स्पष्ट होतील, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. या घटनेनंतर परिसरात चांगलाचं तणाव निर्माण झाला होता. या घटनेचा पुढील तपास दौलताबाद पोलीस करत आहेत.