मनमोहन सिंह यांची मोदी सरकारवर सडकून टीका, म्हणाले…
देशात बेरोजगारीचं प्रमाण वाढलं आहे- मनमोहन सिंह
2 March :- देशात मागील काही काळापासून बेरोजगारीचा मुद्दा चर्चेचा आणि आव्हानाचा विषय ठरत आहे. एकिकडे प्रगतीपथावर वाटचाल करणाऱ्या या राष्ट्रात बेरोजगारीचं वाढतं प्रमाण ही चिंताजनक बाब ठरत आहे. यावरच आता देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी आपलं मत मांडत मोदी सरकारला निशाण्यावर घेतलं आहे. मोदी सरकारवर तोफ डागत सिंह म्हणाले, 2016 मध्ये कोणताही विचार न करता घेण्यात आलेला नोटाबंदीचा निर्णय पाहता त्याचमुळं देशात बेरोजगारीचं प्रमाण वाढलं आहे.
‘दै.झुंजारनेता’ वर क्लिक करा आणि मिळवा ‘वॉटसअँपवर’ लाईव्ह अपडेटस
राज्य आणि तेथील स्थानिक प्रशासनांशी चर्चा न करण्याच्या केंद्राच्या भूमिकेवरही त्यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. आर्थिक विषयांवर आधारित ‘थिंक टँक’ राजीव गांधी इंस्टीट्यूट ऑफ डेवलपमेंट स्टडीजकडून डिजिटल माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या एका विकास परिषदेच्या उदघाटन सोहळ्यासमयी त्यांनी आपले विचार मांडले.
वाढत्या वित्तीय संकटाला लपवण्यासाठी भारत सरकार आणि भारतीय रिझर्व्ह बँक (आरबीआय)कडून करण्यात येणाऱ्या काही अस्थायी उपायांमुळं कर्जाच्या संकटामुळं उद्योगक्षेत्र प्रभावित होत आहे. मुख्य म्हणजे आपण ही परिस्थिती फार काळासाठी दुर्लक्षित ठेवू शकत नाही, हा महत्त्वाचा मुद्दा त्यांनी अधोरेखित केला.
दरम्यान, सदर कार्यक्रमाचं आयोजन हे केरळमधील आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलं होतं. यावेळी सिंह यांनी काही महत्त्वाचे मुद्दे मांडत सत्ताधारी भाजप सरकारच्या निर्णय आणि भूमिकांवर स़डकून टीका केल्याचं पाहायला मिळालं.