भारत

‘या’ महिन्यात होणार सुरु जेष्ठ नागरिकांचे लसीकरण

केंद्रीय आरोग्य मंत्र्यांची मोठी घोषणा

6 Feb :- भारतात पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाला सुरुवात झाली आहे. आता सामान्य नागरिकांना कोरोनाची लस मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असून मार्च महिन्यापासून 50 वर्षावरील नागरिकांच्या लसीकरणाला सुरुवात करणार असल्याची घोषणा केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी केलीय. भारतात 16 जानेवारीपासून कोरोनाच्या लसीकरणाच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली आहे. आतापर्यंत 50 लाखाहून जास्त आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. त्यानंतर ज्येष्ठ नागरिकांना लसीकरणाच्या कार्यक्रमात प्राधान्य दिलं जाणार आहे.

‘दै.झुंजारनेता’ वर क्लिक करा आणि मिळवा ‘वॉटसअँपवर’ लाईव्ह अपडेटस

शुक्रवारी संसदेत बोलताना केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन म्हणाले की, “देशात 50 वर्षावरील नागरिकांच्या लसीकरणाच्या कार्यक्रमाला मार्च महिन्यात सुरुवात करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात एक कोटी सरकारी आणि खासगी आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्याचं लक्ष ठेवण्यात आलं होतं. त्यानंतर दोन कोटी कोरोना योध्यांना लस देण्यात येणार आहे.

काही राज्यात या कार्यक्रमाला दोन फेब्रुवारीपासून सुरुवात झाली आहे.” केंद्रीय आरोग्य मंत्री पुढे म्हणाले की, “हे दोन टप्पे पूर्ण झाल्यानंतर तिसऱ्या टप्प्यातील कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. यामध्ये 50 वर्षावरील प्रत्येक नागरिकाला कोरोनाची लस देण्यात येईल. हा कार्यक्रम मार्च महिन्यात सुरु होईल. थर्ड प्रायोरिटी ग्रुपमध्ये 27 कोटीपेक्षा जास्त लोकांचे लसीकरण करण्यात येणार आहे.” डॉ. हर्षवर्धन म्हणाले की, भारताकडून आतापर्यंत 22 देशांनी कोरोनाच्या लसीची मागणी केली आहे.

यामध्ये अफगानिस्तान, भूटान, बांग्लादेश, मॉरीशस, श्रीलंका, यूएई, मालदीव, मोरक्को, बहरीन, ओमान, अल्जेरिया, कुवैत आणि दक्षिण अफ्रीका या देशांचा समावेश आहे. आतापर्यंत 15 देशांना भारताने कोरोनाची लस दिली आहे. यामध्ये 56 लाख डोस हे ग्रॅंन्टच्या स्वरुपात तर एक कोटी पाच लाख डोस हे कॉन्ट्रॅक्टच्या माध्यमातून देण्यात आले आहेत.