News

COVID-19 निगेटिव्ह आल्यानंतरही रजनीकांत यांची प्रकृती खालावली, सुपरस्टार रुग्णालयामध्ये भरती

हैदराबाद, 25 डिसेंबर: अभिनेता सुपरस्टार रजनीकांत (Rajnikanth) यांची प्रकृती खालावल्याने त्यांना हैदराबादमधील रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं आहे. गेल्या 10 दिवसांपासून ते हैदराबाद याठिकाणी एका सिनेमाचं शूटिंग करत होते. नयनतारा आणि रजनीकांत त्यांच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगसाठी ते हैदराबादमध्ये होते. त्यांनी शूटिंगला सुरुवातही केली, मात्र शूटिंगच्या क्रूमधील 8 जणांना कोरोनाची बाधा झाल्यामुळे शूटिंग थांबवण्यात आलं. अन्नाथे (Annaatthe shooting) या सिनेमाचं शूटिंग सुरू करण्यात आलं होतं. 22 डिसेंबर रोजी रजनीकांत यांची देखील कोरोना चाचणी करण्यात आली होती, मात्र त्यांचा अहवाल कोरोना नेगिटिव्ह आढळून आला होता. त्या दिवसापासून त्यांनी स्वत:ला क्वारंटाइन केलं होतं.

हैदराबाद याठिकाणी असणाऱ्या अपोलो हॉस्पिटलमध्ये रजनीकांत यांना दाखल करण्यात आलं आहे. रुग्णालयाने जारी केलेल्या निवेदनात असं म्हटलं आहे की, रजनीकांत यांच्यामध्ये कोव्हिड-19 ची कोणतीही लक्षण आढळून आली नाहीत, पण रक्तदाबाचा काही प्रमाणात त्रास आढळून आला आहे आणि त्यामुळे पुढील देखरेखीसाठी त्यांना रुग्णलयात भरती करण्यात आलं आहे. रजनीकांत यांना डिस्चार्ज देण्यापूर्वीच त्यांचा रक्तदाब कमी होईपर्यंत तपासणी केली जाणार आहे तसंच रुग्णालयात बारीक देखरेखही ठेवण्यात येणार आहे.

अन्नाथे सिनेमाचं शूटिंग शेड्यूल पुढे ढकलण्यात आल्याने निर्मात्यांना मोठा आर्थिक फटका बसणार आहे. शूटिंग थांबवल्यामुळे रजनीकांत पुन्हा चेन्नईला जाणार होते, मात्र सध्या त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना हैदराबादमधीलच रुग्णालयात भरती करण्यात आलं आहे. अन्नाथे सिनेमाचं शूटिंग हैदराबादला रामोजी फिल्म सिटी येथे सुरू होतं. सिनेमाचं हे शेड्यूल 45 दिवसांचं होतं. खबरदारी म्हणून निर्मात्यांनी इनडोर शूटिंगचा पर्याय निवडला होता.

दुसरीकडे, रजनीकांत तमिळनाडूमध्ये राजकीय पदार्पणाची तयारी करत आहेत. लवकरच पक्षाची घोषणा करण्यासाठी सर्व व्यवस्था करण्यात आली आहे.