News

राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय, वॉटरपार्क उघडण्यास परवानगी

मुंबई, 23 डिसेंबर :   गेल्या 9 महिन्यांपासून बंद  असलेल्या उद्योग धंदे आता पूर्वपदावर येत आहे. हळूहळू करून सर्व उद्योग धंदे सुरू करण्यास  परवानगी देण्यात आली आहे. आता  पर्यटन स्थळावरील वॉटर पार्क, (Water park) जलक्रीडा आणि इनडोअर कार्यक्रमांना राज्य सरकारने परवानगी दिली आहे.

राज्याचे मदत आणि पुर्नवसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी एक पत्रक प्रसिद्ध केले आहे. राज्यातील पर्यटन स्थळांना आधीच परवानगी देण्यात आली आहे. आता कंटेन्मेंट क्षेत्राबाहेर जलक्रीडा, नौकाविहार आणि मनोरंजनाचे इनडोअर कार्यक्रम घेण्यास परवानगी दिली आहे.

‘पर्यटन स्थळावर या छोट्या व्यावसायिकांना मोठ्या आर्थिक संकटाला सामोरं जावं लागलं आहे. त्यामुळे इतर उद्योग धंदे सुरू होत असल्यामुळे या उद्योगांना परवानगी द्यावी अशी मागणी पुढे येत होती, त्यामुळे आता कोरोनाची लाट आटोक्यात आल्यामुळे परवानगी देण्यात येत आहे’, असं वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले.

लॉकडाउनच्या काळात अनेकांचे व्यवसाय बुडाले आहे. अनेक व्यापारी हे कर्जबाजारी झाले आहे. त्यामुळे या व्यावसायिकांना दिलासा देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे, असंही त्यांनी सांगितले.

दरम्यान, ब्रिटन आणि इतर काही देशांमध्ये कोरोना विषाणूचा नवीन प्रकार आढळून आला आहे. या दुसऱ्या प्रकारच्या कोरोना विषाणूचा प्रसार अतिशय वेगाने होत असल्याचे त्यांच्या निष्कर्षावरून स्पष्ट होत आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यात सर्व प्रशासकीय यंत्रणांनी सावध राहतानाच चाचण्यांचे प्रमाण वाढवावे, मास्कचा वापर बंधनकारक करावा, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. पुढचा धोका लक्षात घेऊन जागरुक राहण्याचे आवाहनही मुख्यमंत्री ठाकरे यांनी केले आहे.