नव्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर; मुख्यमंत्री ठाकरेंनी केले ‘हे’ आवाहन!
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर गाफील राहून चालणार नाही- मुख्यमंत्री
22 Dece :- कोरोना विषाणूचा नवा प्रकार ब्रिटन आणि इतर काही देशात आढळून आलाय. या दुसर्या प्रकारच्या करोनाचा प्रसार वेगाने होत आहे, असे त्यांच्या निष्कर्षावरून स्पष्ट होतंय. या पार्श्वभूमीवर राज्यात सर्व प्रशासकीय यंत्रणांनी सावध राहताना चाचण्यांचे प्रमाण वाढवावे, मास्कचा वापर बंधनकारक करावा. तसेच पुढचा धोका लक्षात घेऊन जागरूक राहावे, असे आवाहन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे केलंय. मुख्यमंत्री ठाकरे यांनी आज सर्व विभागीय आयुक्त, सर्व जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्त व जिल्ह्यांचे पोलीस अधिकारी यांच्याशी दूरदृष्य प्रणालीद्वारे संवाद साधला.
‘दै.झुंजारनेता’ वर क्लिक करा आणि मिळवा ‘वॉटसअँपवर’ लाईव्ह अपडेटस
कोरोना स्थिती, कोरोनाचा दुसरा प्रकार आणि त्याअनुषंगाने घ्यावयाची काळजी, लसीकरणाची तयारी आदीबाबत मुख्यमंत्र्यांनी आढावा घेतलाय. यावेळी आरोग्य मंत्री राजेश टोपे, गृह विभागाचे अपर मुख्य सचिव सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, मुंबई महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास, राज्य टास्क फोर्सचे सदस्य डॉ. शशांक जोशी आदी मान्यवर उपस्थित होते.
‘कोरोना विषाणूला प्रतिबंध करण्यात आतापर्यंत सर्वच यंत्रणांनी खूप मेहनत घेतलीय. आता दुसर्या कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर गाफील राहून चालणार नाही. यासाठी अधिक मेहनत घ्यावी लागेल. ऑक्सीजन, व्हेंटिलेटर्स, औषधे यांचा पुरेसा साठा करून ठेवावा, अलगीकरण-विलगीकरणाच्या सोयी सुविधा सज्ज ठेवाव्यात. हा विषाणू ज्या वेगाने पसरतोय, त्या प्रमाणात उपचारांची व चाचण्यांची क्षमता ठेवा. स्थानिक पातळीवर कोरोना विषाणूमध्ये जनुकीय बदल होतात का?, याचा अभ्यास टास्क फोर्समधील डॉक्टरांनी करावा. नव्या प्रकारच्या कोरोना विषाणूमुळे उपचाराची पद्धत याबाबत टास्क फोर्सने अभ्यास करावा’, अशा सूचना यावेळी मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिल्या आहेत. ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ अभियानांतर्गत सहव्याधी (कोमॉरबिड) असलेल्या लोकांचा राज्यातील डेटा (माहिती) आरोग्य विभागाकडे आहे. स्थानिक आरोग्य यंत्रणेने अशा सहव्याधी रुग्णांशी संपर्क साधावा, तसेच त्यांच्याशी संवाद साधून त्यांची आरोग्यविषयक काळजी घेताना त्यांना सतर्क करण्याचे आवाहन करावे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. आजपासून महानगरपालिका क्षेत्रात रात्री 11 ते सकाळी 6 अशी संचारबंदी लागू केलीय.
याकाळात अनावश्यक रहदारी टाळावी.आंतरराष्ट्रीय प्रवास केलेले प्रवासी देशांतर्गत प्रवास करून महाराष्ट्र राज्यात येतात. विविध राज्यातून येणार्या अशा प्रवाशांकडे लक्ष द्यावे. त्यांच्याबाबतीत जागरूकता ठेवावी. त्यासाठी दिल्लीसह इतर राज्यांशी, प्रशासनाशी समन्वय साधावा, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. उन्हाळा-पावसाळ्यातील साथीच्या आजारांवर आपण नियंत्रण मिळवू शकलो आहे. आता हिवाळ्यामध्ये सर्दी-पडसे, ताप-खोकला असे साथीचे आजार वाढलेत. हे लक्षात घेऊन कोरोना चाचण्यांवर अधिक भर दिला पाहिजे. त्यासाठी राज्यात असलेल्या कोरोना चाचणीच्या प्रयोगशाळांचा पूर्ण क्षमतेने वापर करावा.
आरटीपीसीआर चाचण्या वाढव ल्या पाहिजेत, अशी सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केलीय. यावेळी मुख्यमंत्र्यांनी कोरोना विषाणू रोखण्याच्या लसीकरणाच्या तयारीचा आढावा घेतलाय. यात लसीकरण करणारी यंत्रणा, पहिल्या टप्प्यामध्ये ज्यांना लस द्यावयाची आहे त्या आरोग्य कर्मचार्यांचा डेटा संकलित करून तो पाठवणे, शीतगृहांची व्यवस्था, प्रशिक्षण आदी गोष्टींचा त्यांनी आढावा घेतलाय. जिल्हा टास्क फोर्सने लसीकरणासंदर्भात बैठका घ्याव्यात, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिलेत. कोरोना विषाणूमुळे होणार्या मृत्यूचे प्रमाण कमी करण्यावर भर देताना नॉन कोविड रुग्णांकडेही लक्ष द्यावे. मास्क वापरल्याने करोनाच्या प्रादुर्भावास खूप अधिक प्रमाणात प्रतिबंध होतो. त्यामुळे राज्यातील जनतेला मास्कचा वापर बंधनकारक करावा. मास्क न वापरणार्यांवर दंडात्मक कारवाई करावी.