कोरोनाची लाट ओसरली; मात्र नव्या कोरोनाने धास्ती वाढवली!
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी जिल्हाधिकारी, विभागीय अधिकारींची तातडीने बोलावली बैठक
महाराष्ट्रात कोरोनाची लाट ओसरली असल्यामुळे दिलासादायक वातावरण होते. पण आता कोरोनाचा नवा प्रकार समोर आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. महाराष्ट्र सरकार हायअलर्टवर असून तातडीने रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यानंतर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज तातडीने बैठक बोलावली आहे.
शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज दुपारी महाराष्ट्रातील सर्व जिल्हाधिकारी आणि विभागीय अधिकारी यांच्याशी चर्चा करणार आहेत.कोविड 19 संसर्गची परिस्थिती तसंच नव्या कोविड विषाणूंपासून कराव्या लागणाऱ्या उपाय योजना यावर चर्चा होणार आहे.महाराष्ट्रातील महानगरपालिकांमध्ये 5 जानेवारीपर्यंत रात्री 11 ते सकाळी 6 वाजेपर्यंत संचारबदी लागू करण्यात आली आहे.
या नव्या उपाययोजनांचाही आढावा या बैठकीत घेण्यात येणार आहे. पुढील महिन्यात भारतात लसीकरणाची सुरुवात होण्याची शक्यता आहे. या संदर्भात पूर्व नियोजनावरही चर्चा होण्याची शक्यता आहे.