सुरेश रैनावर गुन्हा दाखल, पोलिसांनी टाकला होता पबवर छापा
मुंबई, 22 डिसेंबर : कोरोनाच्या काळात नियमांचे उल्लंघन केल्या प्रकरणी माजी क्रिकेटर सुरेश रैना (suresh raina) याच्याविरोधात मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) गुन्हा दाखल केला आहे. मुंबईतील एका क्लबमध्ये पार्टी सुरू होती. नियमांचे उल्लंघन केल्यामुळे सुरेश रैना याच्यासह आणखी दोन जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
मुंबईतील ड्रॅगन फ्लाय नावाच्या क्लबमध्ये पार्टी सुरू होती. या पार्टीत सुरैश रैना, गायक गुरू रंधावा आणि सुझान खान हे तिघेही हजर होते. राज्य सरकारने कोरोनाच्या परिस्थितीमुळे क्लब आणि बारला नियम लागू केले आहे. पण, या क्लबमध्ये नियमांचे उल्लंघन करण्यात आले होते.
गावदेवी पोलिसांच्या पथकाने या क्लबवर पहाटे 2.30 वाजेच्या सुमारास छापा टाकला असता मास्क, सोशल डिस्टंसिंगचे पालन न करण्यात आल्याचे समोर आले. पोलिसांनी या कारवाईत 34 जणांना ताब्यात घेतले आहे. यात क्लबच्या कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे.
या प्रकरणी पोलिसांनी सुरेश रैना याच्याविरोधात कलम 188 नुसार गुन्हा दाखल केला आहे.
सुरैश रैनाने याच वर्षी 15 ऑगस्ट रोजी क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा निर्णय जाहीर केला होता. महेंद्रसिंग धोनीने एकदिवशी क्रिकेटमधून निवृत्त होण्याची घोषणा केली होती. त्यानंतर अवघ्या काही तासांत रैनाने ‘आपण तुझ्यासोबत आहोत’ असं सांगत निवृत्तीची घोषणा केली होती.