बीड

शेतीचा म्युजिकल फंडा, शेतात लावतो गाणी, पिकं येता भारी!

भोपाळ, 20 डिसेंबर : एका तरूण शेतकऱ्याने आपल्या 12 एकर फार्म हाऊसमध्ये म्युजिक सिस्टम (music system) लावलं आहे. या म्युजिक सिस्टमद्वारे तो आपल्या शेतीला, झाडांना, गायीला आणि जीव-जंतुंना संगीत ऐकवतो. यामुळे पिकांमध्ये अधिक उत्पादन मिळतं असून सेंद्रीय खत-खाद्यही लवकर तयार होत आहे. एवढंच नाही तर, यामुळे गायही अधिक दूध देत असल्याचं सांगण्यात आलं आहे. हा शेतकरी आपल्या फार्म हाऊसमध्ये म्युजिक सिस्टम लावून सेंद्रीय शेती (organic farming) करतोय.

ऐकून विश्वास बसत नाही ना? पण हे खरं आहे. मध्यप्रदेशातील सागर जिल्ह्यातील शेतकरी आकाश चौरसिया कपूरिया गावात सेंद्रीय शेती करतो आहे. तो शेती करताना झाडं-पानं-फुलं-पीकं-जीव-जंतुंना म्युजिक थेरेपी देतोय. आकाशने दिलेल्या माहितीनुसार, ज्याप्रमाणे माणूस तणावात असतो, त्याचप्रमाणे झाडं-पानंही तणावात असतात. तणाव दूर करण्यासाठी त्यांना विविध प्रकारचे आवाज ऐकवले जातात. गायत्री मंत्र, भुंग्याचा आवाज अशाप्रकारे विविध आवाज, झाडांच्या अवस्थेनुसार दिले जातात.

ज्यावेळी बियाणांवर काम सुरू असतं, त्यावेळी गायत्री मंत्र ऐकवला जातो. बियाणांमधून पीक वर येताना, अर्थात ते तारुण्यावस्थेत आल्यावर भुंग्याचा आवाज ऐकवला जातो. ज्यावेळी झाडाला फळं लागण्याची वेळ येते त्यावेळी पुन्हा गायत्री मंत्रांची थेरेपी दिली जाते. या म्युजिक थेरेपीमुळे, 20 ते 30 टक्के अधिक उत्पादन होतं. सेंद्रीय खत बनवण्यासाठी गांडुळ 90 दिवसांचा वेळ घेतात. परंतु रात्री त्यांना म्युजिक थेरेपी दिल्यास, गांडुळ तेवढंच खत केवळ 60 दिवसांत पूर्ण करतात.

झाडा-पानांप्रमाणेच आकाश गायीलाही म्युजिक थेरेपी देतो. गाय गर्भावस्थेत असताना गायत्री मंत्राची थेरेपी देतो. यामुळे देशी गायही एक ते दीड लिटर अधिक दूध देते.

शेती, जीव-जंतू, गायीला म्युजिक थेरेपी दिल्याने सुधारणा होत असल्याबाबत, सागर केंद्रीय विद्यापीठाचे माजी वनस्पती शास्त्री डॉक्टर अजय शंकर मिश्रा यांच्याशी चर्चा करण्यात आली. त्यावेळी त्यांनी सांगितलं की, 120 वर्षांच्या संशोधनातून असं समोर आलं की, झाडं अतिशय संवेदनशील असतात आणि त्यांना संगीत जाणवते.

त्यांनी सांगितलं की, क्लासिकल म्युजिक ऐकवल्यास झाडांमध्ये चांगली प्रगती होते. आकाश चौरसियाने जे केलं त्यात काहीही चुकीचं नाही. हा सिद्धांत आधीपासून प्रस्तावित आहे. 1902 मध्ये संशोधक जी सी बसु यांना संशोधनात हे आढळलं होतं, ज्याचे पेपर 1902 आणि 1904 मध्ये छापण्यात आलं होतं. सेंद्रीय शेतीमध्ये म्युजिक थेरेपीमुळे झालेल्या लाभानंतर आता आकाशकडे, देशातील विविध राज्यातील शेतकरी ट्रेनिंग घेण्यासाठी येतात. या शेतकऱ्यांना आकाश म्युजिक थेरेपीची माहिती देतो.