News

डुलकीने केला घात, मारुती कार आणि बसची समोरासमोर धडक, 1 ठार

महाड, 20 डिसेंबर : मुंबई गोवा महामार्गावर (mumbai goa highway) बस आणि मारुती कारचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 1 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे तर 4 जण जखमी आहे. जखमींना महाड (Mahad) येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पहाटे चार वाजेच्या सुमारास मुंबई गोवा महामार्गावर दासगावजवळ हा भीषण अपघात झाला. देवगड येथून पाच जण मारूती 800 कारने मुंबईकडे जात होते. दासगावाजवळ कार पोहोचली असता बस आणि कारची समोरासमोर धडक झाली. ही धडक इतकी भीषण होती की, मारुती कार बसच्या समोरील चाकाखाली गेली. याच मारुती कारचा चक्काचूर झाला. या अपघातात कारचालकाचा जागीच मृत्यू झाला. तर इतर चौघे जण गंभीर जखमी झाले. पहाटे झोपेची डुलकी लागल्यामुळे हा अपघात झाल्याचे सांगितले जात आहे.

कारमधील  4 जण गंभीर जखमी झाले आहे. जखमींना तातडीने महाड ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, प्रकृती गंभीर असल्यामुळे  उपचारासाठी चिपळूण येथे पाठविण्यात आले आहे.

 शेतामधून घरी परतत असणाऱ्या शेतकऱ्याचा जागीच मृत्यू

दरम्यान, वाशिम शहरानजीक असलेल्या अकोला-नांदेड महामार्गावरील झाकलवाडी परिसरातील रोप वाटिके जवळ भीषण अपघात झाला आहे. अज्ञात वाहनाने मोटरसायकलला दिलेल्या जबर धडकेमध्ये मोटरसायकलस्वार शेतकरी जागीच ठार झाल्याची घटना 19 डिसेंबर रोजी संध्याकाळी घटना घडली.

वाशिम येथील सुदामा कड हे 66 वर्षीय शेतकरी आपल्या सावरगांव बर्डे शिवारातील शेतीमधून दुचाकीने घरी परतत होते. त्यावेळी अकोला-नांदेड महामार्गावरील झाकलवाडी नजीक अज्ञात वाहनाने सुदामा कड यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. त्यामुळे झालेल्या भीषण अपघातात सुदामा कड हे शेतकरी घटनास्थळीच ठार झाले. अपघातानंतर अज्ञात वाहन चालक वाहनासह पसार झाला. वाशिम ग्रामीण पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक रमेश पाटील हे पसार वाहनाचा शोध घेत असून वाहनचालकाविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.