मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज जनतेशी संवाद साधणार, काय करणार घोषणा?
मुंबईः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( uddhav thackeray ) सोशल मीडियाच्या माध्यमातून आज पुन्हा जनतेशी संवाद साधणार आहेत. उद्धव ठाकेर आज काय घोषणा करणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. आज दुपारी एक वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे जनतेशी संवाद साधणार आहेत. विशेष म्हणजे राज्यातील करोना रुग्णांची पुन्हा वाढत आहे. यामुळे ही चिंतेची बाब आहे. यामुळे मुख्यमंत्री आज काय बोलणार याकडे लक्ष असणार आहे.
मुंबईत कांजुरमार्ग येथील मेट्रो कारशेडला हायकोर्टाकडून मिळालेल्या स्थगितीने राज्य सरकारला मोठा झटका बसला आहे. यानंतर काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्राने महाविकास आघाडीत सर्व काही अलबेल नसल्याचं समोर आलं आहे. यावरून विरोधकांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. यापार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विरोधकांना काय उत्तर देणार? याकडे लक्ष असणार आहे.
करोना रुग्णांची वाढती संख्या
राज्यात शनिवारी ७४ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. दिवसभरात ३ हजार ९४० नवीन करोना रुग्ण आढळून आले आहेत. तर ३ हजार ११९ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. नवीन करोना बाधित रुग्णांची संख्या बरे झालेल्या रुग्णांच्या तुलनेत अधिक असल्याने ती काहीशी चिंतेची बाब बनली आहे.