वन विभागाचे ‘मिशन बिबट्या’ यशस्वी
वांगीमध्ये बिबट्याला केले ठार
18 Dece :- करमाळा तालुक्यात तीन बळी घेणाऱ्या नरभक्षक बिबट्याला मारण्यात वनविभाला अखेर यश आलं आहे. डॉ. धवलसिंह मोहिते पाटील यांच्या गोळीने बिबट्याचा वेध घेतला. वांगी नं.4 रांखुडे वस्तीवर पांडुरंग रांखुडे यांच्या केळीच्या बागेत बिबट्याला ठार करण्यात आले. गेल्या काही दिवसांपासून या नरभक्षक बिबट्यामुळे तालुक्यात दहशत पसरली होती. अकलूज येथील डॉ. धवलसिंह मोहिते पाटील हे बारामतीचे तावरे यांचे सहकारी म्हणून ऑपरेशनमध्ये सामील झाले होते. वांगी येथे बिबट्याला केळीच्या बागेत वेढल्यावर या बिबट्याने धवलसिंह यांच्यावर हल्ला करायचा प्रयत्न केला. मात्र, अतिशय सावध असलेल्या मोहिते पाटील यांनी 15 फुटावर असलेल्या या नरभक्षक बिबट्यावर 3 गोळ्या फायर करीत त्याला ठार केले.
‘दै.झुंजारनेता’ वर क्लिक करा आणि मिळवा ‘वॉटसअँपवर’ लाईव्ह अपडेटस
करमाळा तालुक्यात सात डिसेंबरला सकाळी साडेअकरा वाजता याच ठिकाणी एक 9 वर्षांच्या ऊसतोड मजुरांच्या मुलीवर हल्ला केला होता. मुलीचा आवाज ऐकताच इतर ग्रामस्थ काठ्या घेऊन आल्यावर त्याने मुलीला सोडून शेजारील उसात पळ काढला होता. यानंतर मोठ्या संख्येने वन विभाग व पोलिसांचा सशस्त्र फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला आणि सुरू झाले मिशन बिबट्या. या ऊस फडाशेजारी वागर (जाळं) लावून वन विभागाचे गन मॅन, शार्प शूटर व पोलीस अधिकारी उसात जाऊन तपास करीत होते. त्यामुळे बिबट्याने मोर्चा शेजारील केळीच्या बागेत वळवला. येथे शार्प शूटरने फायर केले. मात्र, ते चुकवत बिबट्याने परत उसात धूम ठोकली.
यानंतर वन अधिकाऱ्यांनी सर्व ऊस चारी बाजूने पेटवताच बिबट्या एका बाजूने दुसऱ्या केळीच्या बागेत निसटल्याने हे मिशन फेल झाले. या सर्व नाट्यमय घडामोडी घडत असताना करमाळा आमदार संजय शिंदे हे आपले पिस्तूल घेऊन ग्रामस्थांच्या सोबत थांबले होते. हे मिशन फेल झाल्यानंतर बारामती येथून शार्पशूटर तावरे यांना बोलवण्यात आले होते. त्यांचे सहकारी म्हणून अकलूज येथील डॉ. धवलसिंह मोहिते पाटील ऑपरेशनमध्ये सहभागी झाले होते. आज अखेर याला यश आले आहे.