राजकारण

भाजपमध्ये खळबळ! चंद्रकांत पाटलांच्या राजीनाम्याची मागणी

पक्षनेतृत्वाविरोधात धुसफूस सुरू

15 Dece :- पुणे पदवीधर व व शिक्षक मतदारसंघात भाजपच्या झालेल्या दारुण पराभवानंतर पक्षातील अंतर्गत नाराजी उफाळून आली आहे. नाराज पदाधिकाऱ्यांनी थेट प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनाच लक्ष्य केले असून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. या मागणीमुळं कोल्हापूर भाजपमध्ये खळबळ उडाली आहे. भाजपचे जिल्हा सरचिटणीस शिवाजी बुवा व हातकणंगले तालुक्याचे माजी अध्यक्ष पी. डी. पाटील यांनी पत्रकार परिषदेत ही मागणी केली.

‘दै.झुंजारनेता’ वर क्लिक करा आणि मिळवा ‘वॉटसअँपवर’ लाईव्ह अपडेटस

‘पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघात भाजपचा ज्या पद्धतीनं पराभव झाला, तो पक्षातील व परिवारातील जुन्या, निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या मनाला लागला आहे. प्रदेशाध्यक्ष पाटील व जिल्हाध्यक्ष समरजीत घाटगे या दोघांवर निवडणुकीची प्रामुख्यानं जबाबदारी होती. मात्र, या दोघांनीही ही निवडणूक गांभीर्यानं घेतली नाही. बाहेरून आलेल्या पदाधिकाऱ्यांवर विसंबून राहून एकतर्फी विजय होईल, अशा भ्रमात ते राहिले. त्यांनी ही निवडणूक व्यवस्थित हाताळली नाही. त्यामुळंच भाजपचा एवढ्या मोठ्या फरकानं पराभव झाला,’ असा आरोप भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केला.

‘या निवडणुकीतील पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून चंद्रकांत पाटील व कोल्हापूरचे जिल्हाध्यक्ष समरजीत घाटगे यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी आमची मागणी आहे. निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या वतीनं आम्ही ही मागणी करत आहोत, असं यावेळी शिवाजी बुवा व पी. डी. पाटील यांनी स्पष्ट केलं. भाजपचे वरिष्ठ नेते या पदाधिकाऱ्यांची नाराजी कशी दूर करतात हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.

खुद्द चंद्रकांत पाटील यांनी यापूर्वी दोन वेळा पुणे पदवीधर मतदारसंघातून भाजपचं प्रतिनिधित्व केलं आहे. मागील विधानसभा निवडणुकीत त्यांनी कोथरूडमधून निवडणूक लढवली होती. त्यामुळं यावेळी संग्राम देशमुख यांना भाजपनं उमेदवारी दिली होती. महाविकास आघाडीचे उमेदवार अरुण लाड यांनी मोठ्या फरकानं त्यांचा पराभव केला. अनेक वर्षे भाजपचा बालेकिल्ला असलेल्या या मतदारसंघात पराभव झाल्यानं आता पक्षनेतृत्वाविरोधात धुसफूस सुरू झाली आहे.