आमदार रवी राणांवर यावरून संतापले विधानसभा अध्यक्ष, म्हणाले सभागृहाच्या बाहेर जा!
मुंबई, 15 डिसेंबर: राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आजचा दुसरा आणि शेवटचा दिवस आहे. त्यामुळे चर्चेला वादळातच सुरूवात झाली आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच खडागंजी पाहायला मिळत आहे.
बडनेराचे आमदार रवी राणी गळ्यात संत्र्यांचा हार घालून विधानभवनात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना पोलिसांनी प्रवेशद्वारावरच अडवलं. गळ्यातील संत्र्यांचा हार काढल्यानंतर त्यांना प्रवेश देण्यात आला. त्यावरून नवा वाद निर्माण झाला आहे.
शेतकऱ्यांचं मरण, हेच राज्य सरकारचं धोरण. उद्धवा अजब तुझे सरकार’, असं लिहिलेलं बॅनरचा पोषाख परिधान करून आमदार रवी राणा यांनी सभागृहात प्रवेश केला. यावरून सभागृहात वाद निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं. विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी आमदार रवी राणा यांच्या पोषाखावर आक्षेप घेत त्यांची चांगलीच कानउघाडणी केली. एवढंच नाही तर त्यांना सभागृहाबाहेर जाण्याचे आदेशही दिले. मात्र, त्यानंतर आमदार रवी राणा यांना सरकारविरोधात घोषणाबाजी सुरूच ठेवली. त्यामुळे सत्ताधारी आक्रमक झाले आणि त्यांनी रवी राणा यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी केली. आता सत्ताधाऱ्यांच्या या मागणीवर विधानसभा अध्यक्ष नाना पटोले काय भूमिका घेतात, याकडे सगळ्यांच लक्ष लागलं आहे.
देवेंद्र फडणवीस यांची मध्यस्थी…
विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी आमदार रवी राणा यांच्या पोषाखावर आक्षेप घेतल्यानंतर विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी केली. ते म्हणाले, रवी राणा यांचं वर्तन अयोग्य आहेत. मात्र, त्यांनी मांडलेल्या मुद्द्याबाबत आपण विचार करायला हवा. त्यानंतर फडणवीस यांनी रवी राणा यांना सभागृहाबाहेर जाऊन बॅनरचा पोषाख उतरवण्याची विनंती केली. तरी देखील सत्ताधारी आमदारांचा गोंधळ न थांबल्यानं विधानसभा अध्यक्षांनी उभं राहून, कडक आवाजात शांत राहण्याच्या सदस्यांना सूचना दिल्या.
दुसरीकडे, हक्कभंग सादर करण्यावरून भाजपने जोरदार आक्षेप घेतला. ‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कोणी चॅनलवरुन काही बोलत असेल तर तो राज्याचा अपमान आहे’ अशा शब्दांत विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांनी भाजप नेत्यांना बजावले.
दरम्यान, महिला आणि बालकांच्या विरोधात होणाऱ्या अपराधांविरोधात राज्य सरकारनं शक्ती विधेयक मांडलं आहे. ते विधेयक मंजूर करुन घेण्यासाठी राज्य सरकारला तारेवरची कसरत करावी लागणार आहे. पण विरोधी पक्ष भाजपला मात्र हे विधेयक विधिमंडळाच्या संयुक्त समितीकडे पाठवून त्यावर अधिक चर्चा व्हावी, असा वाटत आहे. त्यासाठीचा प्रस्ताव विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील विधानसभेत मांडणार आहे.
कृषी कायदे संसदेत मंजूर घेताना पुरेशी चर्चा झाली नव्हती, असा आक्षेप घेण्यात येत आहे. त्याचाच आधार राज्यात शक्ती विधेयक मंजूर होणार का याची चर्चा आहे. तसंच याशिवाय इतरही काही विधेयके घाईघाईत मंजूर करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप भाजपनं केला आहे. याशिवाय 2020-2021 पुरवणी मागण्यांवरही आज चर्चा होणार आहे. विधान परिषदेत नवनिर्वाचीत सदस्यांचा परिचय करुन दिला जाणार आहे.