क्राईम

धक्कादायक! शिक्षकेची हत्या; पतीला करण्यात आली अटक!

पतीविरोधात पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

14 Dece :- जुळे सोलापुरातील चंदन नगर परिसरातील निता रेसिडन्सीमध्ये एका शिक्षकेची हत्या करण्यात आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या प्रकरणात महिलेच्या पतीला हत्येच्या आरोपात अटक करण्यात आली आहे. सोमवारी सकाळी ही घटना उडकीस आली. घटनेची माहिती मिळताच सोलापूर पोलिस आयुक्तालयातील वरीष्ठ पोलिस अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. बराच वेळ पंचनामा आणि प्राथमिक चौकशी करुन सायंकाळी साडे पाचच्या सुमारास आरोपी पतीविरोधात विजापूर नाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

‘दै.झुंजारनेता’ वर क्लिक करा आणि मिळवा ‘वॉटसअँपवर’ लाईव्ह अपडेटस

अर्चना विकास हरवाळकर (वय 35)असे मृत शिक्षकेचे नाव आहे. अर्चना हरवाळकर आणि त्यांचे पती विकास हरवाळकर हे आपला मुलगा वेदांत (वय 6) याच्यासह जुळे सोलापुरातील निता रेसिडन्सी येथे राहावयास होते. सकाळी 10.46 वाजता विकास हरवाळकर यांच्या व्हॉट्सअॅप स्टेटसवर काही मजकूर लिहिण्यात आला होता. यावरुन आरोपी विकास हरवाळकर यांचे जवळचे नातेवाईक असलेल्या प्रणय कांबळे यांना संशय आला. त्यामुळे प्रणय कांबळे यांनी तात्काळ इतर नातेवाईकांशी संपर्क साधून विकास हरवाळकर यांच्या घराकडे धाव घेतली. ज्यावेळी फिर्यादी प्रणय कांबळे यांना विकास हरवाळकर यांच्या घराची बेल दाबली आणि दरवाजा ठोठावला त्यावेळी आतून काहीही प्रतिसाद मिळाला नाही. प्रणय यांच्या आवाजामुळे शेजारी राहणारे देखील जमा झाले. मात्र आतून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने दरवाजाची लोखंडी जाळी काढून, लाकडी दरवाज्याला धक्का मारुन उघडले असता आरोपी विकास हरवाळकर हा समोर आला. त्यावेळी त्याच्या टि शर्टवर रक्ताचे डाग दिसून आले.

फिर्यादी प्रणय कांबळे याला संशय आल्याने आत खोलीत जाऊन पाहणी केली असता आरोपी विकास हरवाळकर याची पत्नी अर्चना ही रक्ताच्या थारोळ्यात मृतावस्थेत पडल्याचे दिसून आले. त्यामुळे पत्नीच्या हत्येच्या आरोपात विकास हरवाळकर यांच्या विरोधात विजापूर नाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी विकास हरवाळकर आणि मयत अर्चना हरवाळकर हे दोघेही सोलापूर जिल्हा परिषदेचे शाळेत प्राथमिक शिक्षक म्हणून कार्य़रत होते. दोघांनी जवळपास 7 वर्षांपूर्वी प्रेमविवाह केला होता. दोघेही अक्कलकोट तालुक्यातील शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत होते. त्यांना सहा वर्षाचा एक मुलगा देखील आहे.

अवघं तिघांचं कुटुंब आणि दोघेही उच्च शिक्षित तसेच कमावणारे असताना विकास यांने टोकाचे पाऊल का उचचलले याचा शोध पोलिस घेत आहेत. दरम्यान सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी विकास याने स्वत: विषारी द्रव्य प्राशन केले होते. त्यामुळे पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्यास सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात डॉक्टरांच्या निगराणी खाली ठेवण्यात आले होते.दरम्यान या प्रकरणाचा सविस्तर तपास सपोनि शितलकुमार कोल्हाळ करत आहेत.