News

अमेरिकेचा मोठा निर्णय! ‘फायजर’च्या लशीला मंजुरी

वॉशिंग्टन: करोना संसर्गामुळे सर्वाधिक जीवितहानी सोसत असलेल्या अमेरिकेने मोठा निर्णय घेतला आहे. अमेरिकेच्या अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) सल्लागार समितीने अखेर फायजरच्या लस वापराला मंजुरी दिली आहे. आणीबाणीच्या काळात ‘फायझर-बायोएनटेक’ची लस वापरता येणार आहे.

अमेरिकेने लसवापराच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल टाकले आहे. अमेरिकेत करोनाच्या संसर्गामुळे तब्बल २ लाख ९२ हजार नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर, दोन दिवसांपूर्वी एका दिवसात तीन हजारांहून अधिक मृत्यू नोंदवले गेले. हा जगातील आत्तापर्यंतचा सर्वांत मोठा मृतांचा आकडा आहे. त्याच्या दुसऱ्याच दिवशी अमेरिकेच्या ‘एफडीए’च्या अंतर्गत येणाऱ्या लस व संबंधित जैविक उत्पादन सल्लागार समितीची बैठक झाली. आठ तासांच्या चर्चेनंतर अमेरिकी औषध कंपनी फायझर व जर्मन औषध कंपनी बायोएनटेक यांची संयुक्त निर्मिती असलेली लस आणीबाणीच्या स्थितीत वापरण्याची शिफारस ‘एफडीए’ला करण्याचा निर्णय मतदानाद्वारे घेण्यात आला. लशीच्या वापराच्या बाजूने १७ व विरोधात ४ मते पडली व एक सदस्य तटस्थ राहिला होता. त्यानंतर ‘एफडीए’ने या शिफारशी स्वीकारल्या असून आणीबाणीच्या काळात रुग्णाला ‘फायझर’ची लस दिली जाणार आहे.

संपूर्ण लसीकरणाचे काय?

‘फायझर’ने तूर्तास आणीबाणी काळातील लसवापरासाठी अर्ज केला असून, ही शिफारस त्यापुरतीच मर्यादित आहे. संपूर्ण लसीकरणासाठी ‘फायझर’ला स्वतंत्र अर्ज करावा लागणार आहे. इतर लशींप्रमाणेच फायझरच्या लशीसोबतही लिखित वैद्यकीय सूचना असतील. यामध्ये गंभीर अॅलर्जीचा इतिहास असलेल्या तसेच लशीतील घटकांची अॅलर्जी असलेल्यांसाठी धोक्याचा इशारा असेल.

दरम्यान, अमेरिकेचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विट करत करोना लस निर्मितीचे श्रेय घेण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी अमेरिकेतील एका सुप्रसिद्ध टीव्ही शोच्या प्रोडक्शन टीमला उद्देशून हे ट्विट केले आहे. अमेरिकेतील लस निर्मिती हा एक चमत्कार असून याचे श्रेय डोनाल्ड ट्रम्प यांना मिळालेच पाहिजे असे ट्विट ट्रम्प यांनी केले आहे.

फायझर या कंपनीने लस निर्मितीत आघाडी मिळवलेली आहे. फायझरची लस ही ९५ टक्क्यांहूनही अधिक प्रभावी असल्याचा दावा कंपनीने केला आहे. या बरोबरच १७ डिसेंबरला मॉडर्ना आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थच्या करोना लशीला मंजुरी देण्यासाठी देखील एक बैठक आयोजित केली जाणार आहे. मॉडर्नाची करोना लस करोनावर अतिशय प्रभावी असल्याचा दावा मॉडर्नाने देखील केला आहे. सुरुवातीला मर्यादित संख्येत या लशीची निर्मिती केली जाणार आहे. प्राथमिकतेनुसार, या लशीचा डोस सर्वात प्रथम आरोग्य कर्मचारी, लष्कर आणि पोलिस कर्मचाऱ्यांना देण्यात येणार आहे.