राजकारण

‘रावसाहेब दानवे यांना घरात घुसून मारण्याची वेळ आली आहे’

राज्यमंत्री बच्चू कडू संतापले

10 Dece :- नव्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीत आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांचा संबंध चीन व पाकिस्तानशी जोडणारे केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्यावर राज्यमंत्री बच्चू कडू संतापले आहेत. ‘रावसाहेब दानवे यांना आता घरात घुसून मारण्याची वेळ आली आहे,’ असा संताप कडू यांनी व्यक्त केला आहे. केंद्र सरकारनं आणलेल्या नव्या कृषी कायद्यांच्या विरोधात पंजाब, हरयाणासह काही राज्यांतील शेतकरी गेल्या १५ दिवसांपासून आंदोलन करत आहेत.

‘दै.झुंजारनेता’ वर क्लिक करा आणि मिळवा ‘वॉटसअँपवर’ लाईव्ह अपडेटस

कृषी कायदे रद्द करा, अशी त्यांची मागणी आहे. तर, कायद्यात बदल करण्याच्या भूमिकेपर्यंत सरकार आलं आहे. मात्र, शेतकरी आपल्या मागणीवर ठाम आहेत. कोणत्याही राजकीय पक्षाच्या झेंड्याखाली हे आंदोलन सुरू नसल्यामुळं सरकारची मोठी अडचण झाली आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपच्या नेत्यांकडून आंदोलनाबद्दल वेगवेगळी वक्तव्ये केली जात आहेत. केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी जालना इथं बोलताना, ‘हे आंदोलन एक कटकारस्थान आहे. आंदोलकांना चीन व पाकिस्तानाची मदत फूस आहे,’ असं वक्तव्य केलं होतं. त्याच्या या वक्तव्याचे तीव्र पडसाद उमटत आहेत.

दानवे यांचं वक्तव्य केंद्र सरकारनं गांभीर्यानं घेऊन चीन व पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राइक करावा, अशी मागणी शिवसेनेनं केली आहे. तर, बच्चू कडू यांनी ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेशी बोलताना दानवे यांच्यावर जोरदार तोफ डागली आहे. ‘मागच्या वेळेस दानवे यांनी शेतकऱ्यांबद्दल आक्षेपार्ह विधान केलं होतं तेव्हा आम्ही त्यांच्या घराला घेराव घातला होता. मात्र, आता परिस्थिती अशी आली आहे की आम्हाला त्यांच्या घरात घुसून त्यांना चोप द्यावा लागेल,’ असं कडू यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या वक्तव्यावरून वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.