महाराष्ट्र

तृप्ती देसाई यांना शिर्डीत येण्यास पायबंद!

पोलीस तृप्ती देसाईंच्या घरी दाखल

8 Dece :- भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांना पोलिसांनी शिर्डीत येण्यास मज्जाव केला आहे. शिर्डीच्या प्रांत अधिकाऱ्यांनी त्यांना नोटीस बजावली असून शिर्डी पोलीस तृप्ती देसाईंच्या घरी दाखल झाले आहेत. शिर्डी संस्थानने भारतीय वेशभूषा घालण्यासंदर्भातील आवाहन केल्यानंतर तृप्ती देसाई यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. या पार्श्वभूमीवर त्यांना 8 ते 11 डिसेंबरपर्यंत शिर्डी हद्दीत येण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे.

‘दै.झुंजारनेता’ वर क्लिक करा आणि मिळवा ‘वॉटसअँपवर’ लाईव्ह अपडेटस

कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलीस प्रशासनाने हा निर्णय घेतल्याचं सांगण्यात येत आहे. शिर्डीच्या साई मंदिरात दर्शनाला भाविकांनी भारतीय पोषाखात यावे असं आवाहन साई संस्थानने केलं आहे. तसे फलकही साई मंदिर परिसरात लावण्यात आले आहेत. त्यानंतर यावरून मोठा वाद निर्माण झाला. भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी 10 डिसेंबर रोजी शिर्डीत येऊन ते फलक हटवू असा‌ इशारा दिला असून त्यानंतर ब्राम्हण महासंघ आक्रमक झाला.

ब्राम्हण महासंघाने संस्थानच्या निर्णयाचे स्वागत करत शिर्डीत येऊन सदर फलकाला पुष्पहार घालून पूजन केलं. ‘तृप्ती देसाई या फक्त सवंग प्रसिद्धीसाठी असे स्टंट करत आहेत. त्यांना फलकाला हात लावू देणार नाही आणि शिर्डीतही पाय ठेवू देणार नाही,’ असा‌ इशारा ब्राम्हण महासंघाने दिला आहे. भारतीय संस्कृतीनुसार कपडे घालण्याचे संस्थानने केलेले आवाहन योग्य असून तृप्ती देसाई यांनी कायदा हातात घेऊ नये, अन्यथा आम्ही त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर देऊ, असा इशारा ब्राम्हण महासंघाचे संस्थापक अध्यक्ष आनंद दवे यांनी काही दिवसांपूर्वी दिला आहे.