बीड

अमित शहांनी बोलावली शेतकरी नेत्यांची तातडीची बैठक

नवी दिल्ली: ‘भारत बंद’ (Bharat Bandh) बरोबर व्यापक झालेल्या शेतकरी आंदोलनाच्या (Farmers Protest) पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी आज सध्याकाळी ७ वाजता शेतकरी नेत्यांची बैठक बोलावली आहे. ९ डिसेंबरला बुधवारी सरकार शेतकरी नेत्यांशी चर्चा करणार असतानाही अमित शहा यांनी ही बैठक अचानक बोलावली असल्याने ही बैठक अत्यंत महत्वाची असल्याचे बोलले जात आहे. (Amit Shah calls meeting with farmers leaders today at 7 pm)

शेतकरी नेते आज संध्याकाळी ७ वाजता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना भेटतील. ही एक अनौपचारिक अशी बैठक होणार असल्याचे बोलले जात आहे. गृहमंत्री अमित शहा यांनी आज सकाळीच या बैठकीचा प्रस्ताव शेतकरी नेत्यांकडे पाठवला. या बैठकीत शेतकऱ्यांचे एकूण १३ प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.

अमित शहा यांनी सिंघू, टिकरी आणि गाजीपूर बॉर्डरवर बसलेल्या शेतकरी नेत्यांना चर्चेसाठी बोलावले आहे. राकेश टिकेत यांना देखील बैठकीत बोलावण्यात आले आहे. मला फोन आला होता. मला बैठकीचे आमंत्रण मिळाले असल्याचे टिकेत म्हणाले. आपण बैठकीला जाणार असून इतर अनेक नेते या बैठकीला येणार आहेत. आम्हाला त्यांनी ७ वाजता बैठकीला बोलावले आहे, अशी माहिती टिकेत यांनी दिली आहे.

या पू्र्वी सरकार आणि शेतकऱ्यांच्या अनेक चर्चेच्या फेऱ्या झालेल्या आहेत. मात्र त्या सर्व चर्चा अयशस्वी ठरलेल्या आहेत. शनिवारी झालेली शेवटची बैठक तब्बल सात तास चालली. मात्र त्यातून कोणताही मार्ग निघू शकला नाही. सरकारने ९ डिसेंबरला पुन्हा बैठक बोलावली आहे. मात्र, नवे ३ केंद्रीय कृषी कायदे मागे घेण्याव्यतिरिक्त आम्हाला काहीही मंजूर नसेल, असे शेतकऱ्यांनी आधीच स्पष्ट केले आहे.

हे कायदे लागू झाल्यास शेतकऱ्यांचे उत्पन्न कमी होईल अशी भिती शेतकऱ्यांना आहे. त्याच प्रमाणे या कायद्यांमुळे शेतकरी कॉर्पोरेट कंपन्यांवर अवलंबून राहतील अशीही भिती शेतकऱ्यांना वाटत आहे.