ज्येष्ठ अभिनेते रवी पटवर्धन काळाच्या पडद्याआड
हृदयविकाराच्या झटक्यामुळे निधन झाले
6 Dece :- अनेक मराठी चित्रपटात, नाटकात आणि मालिकांमध्ये महत्वपूर्ण भूमिका साकारणारे ज्येष्ठ अभिनेते रवी पटवर्धन यांचे हृदयविकाराच्या झटक्यामुळे निधन झाले आहे. ते 83 वर्षांचे होते. मिळालेल्या माहितीनुसार शनिवारी रात्री 5 डिसेंबर रोजी त्यांचे निधन झाले. अलीकडेच ते ‘अग्गबाई सासूबाई..’ या मालिकेत एक महत्त्वाची भूमिका साकारात होते. अनेक नाटकांत आणि चित्रपटात त्यांनी साकारलेल्या भूमिका अविस्मरणीय आहेत.
‘दै.झुंजारनेता’ वर क्लिक करा आणि मिळवा ‘वॉटसअँपवर’ लाईव्ह अपडेटस
1974 मध्ये त्यांनी रत्नाकर मतकरींबरोबर आरण्यक या नाटकात काम केलं. यामध्ये ते धृतराष्ट्राची भूमिका साकारत होते, वयाच्या 82 व्या वर्षीही त्यांनी ही भूमिका साकारली होती. मराठी मनोरंजन विश्वामध्येत्यांचा एक दबदबा होता. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला साजेशा भारदस्त भूमिका त्यांनी साकारल्या. झुपकेदार मिशा, आवाजातील जरब, त्या त्या भूमिकेसाठी आवश्यक धीरगंभीर चेहरा अशी त्यांची ओळख होती.अलीकडेच ते ‘बबड्याचे आजोबा’ म्हणून पुन्हा एकदा घराघरात पोहोचले होते.
एक तापट पण तितकेच प्रेमळ अशी आजोबा ‘दत्तात्रय बंडोपंत कुलकर्णी’ ही भूमिका त्यांनी साकारली. यावेळी निवेदिता सराफ यांच्या सासऱ्याची भूमिका रवी पटवर्धन यांनी साकारली होती. सासरे आणि सून या नात्यातील एक वेगळा पैलू या भूमिकेतून त्यांनी मांडला. कोरोना काळातील ज्येष्ठ नागरिकांना काम करण्याची परवानगी नसल्याने त्यांना या मालिकेत पुन्हा पाहता आलं नाही.
काही वेळा ते व्हिडीओ कॉलिंगच्या माध्यमातून या मालिकेत दिसले होते. रवी पटवर्धन यांच्या वैयक्तिक आयुष्याबाबत बोलायचे झाले तर ते, रिझर्व्ह बँकेत नोकरी करत होते. ते ठाण्याच्या घरात राहत होते, याच घरात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रवी पटवर्धन यांच्या पश्चात पत्नी, 2 मुलं, सुना, मुलगी, जावई, 4 नातवंड असा परिवार आहे. यावर्षी 2020 सालामध्ये कला विश्वाने अनेक कलाकार गमावले आहेत.