भारताने T20 सिरीज जिंकली; पांड्याच्या फटकेबाजीने कांगारू हैराण!
धवन आणि विराटने रचला विजयाचा पाया
6 Dece :- हार्दिक पांड्याच्या तुफान फटकेबाजीमुळे भारताने दुसऱ्या टी-20मध्ये ऑस्ट्रेलिया चा पराभव केला आहे. याचसोबत भारताने वनडे सीरिजच्या पराभवाचा बदला घेतला आहे. टी-20 सीरिजची एक मॅच बाकी असतानाच भारताने ही सीरिज 2-0ने खिशात टाकली आहे. ऑस्ट्रेलियाने ठेवलेल्या 195 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताची सुरुवात चांगली झाली. राहुल आणि शिखर धवनच्या जोडीने 5.2 ओव्हरमध्येच 56 रनची ओपनिंग पार्टनरशीप केली, पण राहुल 22 बॉलमध्ये 30 रन करून आऊट झाला.
राहुलची विकेट गेल्यानंतर शिखर धवन आणि विराट कोहली यांनी फटकेबाजी सुरूच ठेवली. शिखर धवन 36 बॉलमध्ये 52 तर विराटने 24 बॉलमध्ये 40 रन केले. हार्दिक पांड्या 22 बॉलमध्ये 42 रनवर आणि श्रेयस अय्यर 5 बॉलमध्ये 12 रनवर नाबाद राहिला. हार्दिक पांड्याने त्याच्या खेळीमध्ये 3 फोर आणि 2 सिक्स मारल्या. भारताला शेवटच्या ओव्हरमध्ये विजयासाठी 14 रनची गरज होती, तेव्हा पांड्याने डॅनियल सॅम्सच्या बॉलिंगवर दोन सिक्स आणि दोन रन काढून भारताला जिंकवून दिलं.
ऑस्ट्रेलियाकडून स्वेपसन, झम्पा आणि सॅम्स यांना प्रत्येकी एक-एक विकेट मिळाली. त्याआधी बॉलिंगमध्ये टी. नटराजन याने पुन्हा एकदा चमकदार कामगिरी केली, पण ऑस्ट्रेलियाने भारताला विजयासाठी 195 रनचं आव्हान दिलं. टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतलेल्या भारताने ऑस्ट्रेलियाला 20 ओव्हरमध्ये 194-5 एवढा स्कोअर करून दिला. कर्णधार मॅथ्यू वेडने 32 बॉलमध्ये 58 रन तर स्टीव्ह स्मिथने 38 बॉलमध्ये 46 रनची खेळी केली. मॅक्सवेलने 13 बॉलमध्ये 22, हेनरिक्सने 18 बॉलमध्ये 26, स्टॉयनिसने 7 बॉलमध्ये 16 तर डॅनियल सॅम्सने 3 बॉलमध्ये 8 रन केले.