बीड

बीडकरांनो सावधान! मोबाईल चोरट्यांचा सुळसुळाट

भाजी मंडईमध्ये वाढले मोबाईल चोरीचे प्रमाण

5 Dece :- बीड जिल्ह्यात सध्या काय चोरीला जाईल याचा नेम राहिला नाही. जिल्ह्यात वाळू चोरीला जाते, गाड्या चोरीला जातात, सोन-चांदी आणि मंगळसूत्र या आम गोष्टी झाल्या आहेत. आता भुरट्या चोरांनी सर्वांच्या आवडीची आणि गरजेची गोष्ट चोरण्यास सुरुवात केली आहे. ती गोष्ट म्हणजे मोबाईल. गेल्या काही दिवसांपासून बीड शहरात अनेक भागात मोबाईल चोरीच्या घटना प्रचंड प्रमाणात वाढल्या आहेत.

‘दै.झुंजारनेता’ वर क्लिक करा आणि मिळवा ‘वॉटसअँपवर’ लाईव्ह अपडेटस

बीड शहरातील मुख्यतः मोबाईल चोरीला जाण्याच्या घटना साठे चौक, नवी भाजी मंडई, सुभाष रोड आणि बस स्टॅन्ड जवळ प्रचंड प्रमाणात घडत आहेत. पोलिसांचा धाक राहिला नसल्याने दिवसा ढवळ्या चोऱ्या होण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत आहेत. सध्या चोरट्यांनी मोबाईलला टार्गेट केले आहे. बीड शहरातील गर्दी असलेल्या भाजी मंडई सारख्या परिसरातून दरदिवशी किमान एका व्यक्तीचा मोबाईल चोरी होत असून या मोबाईल चोरट्यांना पोलिसांचा ‘अर्थपूर्ण’ आशीर्वाद आहे की काय अशी शंका नागरिकांतून व्यक्त केली जात आहे.

मोबाईल चोरीच्या घटना भाजी खरेदी करताना अधिक प्रमाणात घडत आहेत. नागरिक भाजी खरेदी करत असताना आजूबाजूला अचानक पाच सहा माणसांचा घोळका जमा होतो आणि याच दरम्यान पिशवी डोळ्याआड धरून भुरटा चोर हातचलाखीने मोबाईल चोरण्याचा डाव साधतो. आणि काही क्षणातच मोबाईल बंद करून टाकल्या जातो. पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केवळ औपचारिकता म्हणून नोंदवून घेतली जाते. या शिवाय पोलीस प्रशासन कुठलीही कारवाई करत नाही.

याप्रकरणी पोलीस अधीक्षकांनी लक्ष घालून आशा चोरट्यांच्या मुसक्या आवळणे गरजेचे आहे. तर दुसरीकडे वाढत्या मोबाईल चोरीचे प्रामण पाहता नागरिकांनी पोलीस यंत्रणेवर अवलंबून न राहता स्वतः खबरदारी घेणे गरजेचे झाले आहे. भाजी मंडई सारख्या परिसरात भाजी खरेदी करत असताना आपल्या आजूबाजूला भुरट्या चोरट्यांकडे लक्ष ठेवावे. शिवाय या परिसरात मौल्यवान वस्तू सोने-चांदीचे दागिने, लेडीस पर्स, रोकड रक्कम (गरजेपेक्षा जास्त) घेऊन जाऊ नये. आहे त्या वस्तू संभाळाव्यात.