मोठी बातमी! पुण्यापासून जवळच असलेल्या ‘या’ शहरात उद्यापासून संचारबंदी
पिंपरी-चिचंवड, 5 डिसेंबर: आषाढी, कार्तिकी वारीनंतर आता तिर्थक्षेत्र आंळदी येथे दरवर्षी होणाऱ्या संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळ्यावर कोरोनाचं सावट निर्माण झालं आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आळंदीत उद्यापासून अर्थात 6 डिसेंबर ते 16 डिसेंबर या कालावधीत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. पिंपरीचे पोलीस उपायुक्त मंच्चाक इप्पर यांनी ही माहिती दिली आहे.
आंळदी येथे संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त व कार्तिकी यात्रा येत्या 8 ते 14 डिसेंबरपर्यत होणार आहे. मात्र, यंदा कोरोना संसर्गाचं संकट निर्माण झालं आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी आंळदी शहरासह आजुबाजुच्या गावांमध्ये पोलिस प्रशासनाकडून संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
उद्यापासून आळंदीत कलम 141 लागू करण्यात येणार आहे. त्यामुळे बाहेरील आलेल्या कोणत्याही व्यक्तीला आळंदी शहरात प्रवेश करता येणार नाही. या पार्श्वभूमीवर यंदाचा संजीवन समाधी सोहळा कसा पार पडणार आहे, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
पोलीस उपायुक्त मंचार इप्पाक यांनी सांगितल की, आळंदीतील कार्तिकी वारी संदर्भात जिल्हा अधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी पुण्यात एक बैठक घेतली. त्या बैठकीमध्ये कोरोना संसर्गचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी पोलिस प्रशासनाकडून 6 डिसेंबर ते 14 डिसेंबरपर्यंत आळंदीसह आजुबाजुच्या परिसरात संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. दरम्यान, पंढरपूरच्या धर्तीवर ही शिफारस पोलिसांनी केली होती.
मोठा पोलिस बंदोबस्त…
आळंदीसह मंदिर परिसरात पोलिसांचा मोठ्या प्रमाणात बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. आळंदीकडे येणारे सर्व रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहेत. औद्योगिक वसाहतीतील वाहतूक देखील बंद करण्यात येणार आहे. उद्योग नगरीतील वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग म्हणून बायपासचा वापर करावा, अशी सूचना वाहतूक विभागाकडून देण्यात आली आहे.
फक्त 20 वारकऱ्यांना परवानगी…
कार्तिकी यात्रा आणि संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळ्याच्या काळात वारकऱ्यांचा आळंदीत मुक्काम असतो. ही परंपरा कायम ठेवत पंढरपूरातून आळंदीतील कार्तिकी वारीसाठी येणाऱ्या श्री. पांडुरंग, संत नामदेव, संत पुंडलिक या तीन दिंड्यांना राज्य शासनानं परवानगी दिली आहे. तीनही दिंड्यांसोबत प्रत्येकी वीस लोकांना आळंदीत येण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. तीन दिंड्यांसाठी स्वतंत्र एसटी बसची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.