News

सरकार स्थिर राहावं असं वाटत असेल तर… काँग्रेसच्या मंत्र्याचा थेट इशारा

मुंबई: विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपचा दारुण पराभव झाल्यानं महाविकास आघाडीमध्ये सध्या आनंदाचं वातावरण आहे. आघाडीचे नेते तिन्ही पक्षाच्या एकजुटीचं कौतुक करत आहे. हे सगळं सुरू असतानाच, महाराष्ट्र काँग्रेसच्या कार्याध्यक्ष आणि महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी केलेल्या एका वक्तव्य केलं आहे. ठाकूर यांनी महाआघाडीतील मित्रपक्षांना थेट इशाराच दिला आहे. (Yashomati Thakur warns Shiv Sena, NCP Leaders)

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नुकतंच एका मुलाखतीत काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाबद्दल मत मांडलं होतं. त्याचा संदर्भ यशोमती ठाकूर यांच्या वक्तव्याला असल्याचं बोललं जात आहे. ‘कुठल्याही राजकीय पक्षाच्या नेतृत्वाला पक्षात आणि लोकांमध्ये किती मान्यता आहे हे फार महत्त्वाचं असतं. काँग्रेसजनांमध्ये गांधी-नेहरू घराण्याबद्दल आजही प्रचंड आस्था आहे. मात्र, राहुल गांधी यांच्या नेतृत्वात सातत्याची कमी दिसते,’ असं पवार म्हणाले होते.

पवार यांच्या या वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर यशोमती ठाकूर यांनी आज एक ट्वीट केलं आहे. अर्थात, त्यांनी ट्वीटमध्ये कोणाच्याही नावाचा उल्लेख केलेला नाही. मात्र, ते पुरेसं सूचक आहे. आपल्या ट्वीटमध्ये त्या म्हणतात, ‘आघाडीमधील काही नेत्यांच्या काही मुलाखती/लेख माझ्या निदर्शनास आलेत. काँग्रेसची कार्याध्यक्षा म्हणून आघाडीतील मित्रपक्षांना सांगू इच्छिते की हे सरकार स्थिर राहावं असं वाटत असेल कर काँग्रेसच्या शीर्ष नेतृत्वावर टीका-टीप्पणी करणं टाळावं. आघाडी धर्माचं पालन सर्वांनी करावं.’

‘काँग्रेसचं नेतृत्व अतिशय स्थिर आहे, निर्णयक्षम आहे. राज्यातील महाविकास आघाडी हा त्याच निर्णयक्षमतेचा परिपाक आहे,’ असंही त्यांनी पुढं म्हटलं आहे.