राजकारण

महाविकास आघाडीचा विजय म्हणजे वाचाळ बडबड करणार्‍यांना चपराक

अजित पवारांचा भाजपला टोला

4 Dece :- पदवीधर मतदारसंघ निवडणुकांचे निकाल जाहीर झाले आहे. यामध्ये भाजपला दारुण पराभवाचा सामना करावा लागला आहे. पुणे आणि नागपूर या भाजपचा गड मानल्या जाणाऱ्या महत्त्वाच्या जागांवर महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी विजय मिळवला आहे. यावरुन आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या निकालाने विरोधकांना चपराक बसली असल्याचे म्हणत भाजपला टोला लगावला आहे.

‘दै.झुंजारनेता’ वर क्लिक करा आणि मिळवा ‘वॉटसअँपवर’ लाईव्ह अपडेटस

अजित पवार या विजयावर बोलताना म्हणाले की, ‘नागपुरात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीसांच्या वडिलांनी गेली कित्येक वर्षे जागा राखलेली होती. आता तिथेही महाविकास आघाडीचा उमेदवार विजयी झाला आहे. औरंगाबादेतही न भुतो न भविष्य असा विजय राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराच्या पारड्यात पडला आहे. अमरावती शिक्षक मतदारसंघाची जागा निवडून आली नाही, याचे दुःख असल्याचेही पवार म्हणाले.

अजित पवार यांनी नाव न घेता भाजपमधील काही मोठ्या नेत्यांना टोला लगावला आहे. बरेच लोक वाचाळ बडबड करत होते. महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा विजय म्हणजे त्या वाचाळविरांना जबरदस्त चपराक आहे. असे म्हणत अजित पवारांनी भाजपला चांगलाच टोला लगावला आहे. तसेच आता लोकांनी महाविकास आघाडीला पाठिंबा दिलाय हे या निकालांवरुन स्पष्ट झाले असल्याचेही ते म्हणाले. पुढे बोलताना अजित पवार म्हणाले की, ‘महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा विजय हा आघाडीतील सर्व पक्षांच्या एकतेचा विजय आहे.

राज्यातील जनतेचा सरकारवर विश्वास असल्याचे हे प्रतिक आहे.’ तसेच महाविकास आघाडीच्या उमेदवारांना विजयी केल्याबद्दल सर्व मतदारांचे आभार अजित पवारांनी मानले. पुढे पवार म्हणाले की, ‘राज्यातील सुशिक्षित वर्ग, पदवीधर आणि शिक्षकांनी महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मतदान केले आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री आणि आमची सर्वांचीच जबाबदारी वाढली आहे. त्याचबरोबर एकत्रित येत निवडणूक लढवण्याचे फळं काय आहे हे देखील पाहायला मिळाल्याचे पवार म्हणाले.