हिंमत असेल तर एकट्याने लढा; चंद्रकांत पाटलांचं सत्ताधाऱ्यांना आव्हान
पुणे: ‘पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील निवडणूक निकालांमध्ये आश्चर्यकारक काहीही नाही. तिघे-तिघे मिळून एकट्याशी लढल्यानंतर यापेक्षा वेगळं चित्र दिसणार नव्हतं. तरीही आम्ही निकराने लढलो. त्यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी एकेकट्यानं लढावं. पण त्यांच्यात ती हिंमत नाही,’ अशी प्रतिक्रिया भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. (Chandrakant Patil Challenges Maha Vikas Aghadi)
पदवीधर, शिक्षक व स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधान परिषदेवर निवडून द्यावयाच्या सहा जागांसाठी १ डिसेंबरला निवडणूक झाली होती. या निवडणुकीचे जवळपास सर्व निकाल हाती आले असून त्यात भाजपला मोठा धक्का बसला आहे. पुणे व नागपूर हे बालेकिल्ले भाजपनं गमावले आहेत. तिथं महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी बाजी मारली आहे. भाजपच्या या पराभवाला तीन पक्षाची एकजूट कारणीभूत असल्याचं पाटील यांनी मान्य केलं आहे. पुण्यात मतं खाणारा तिसरा ताकदीचा उमेदवार नसल्यामुळं भाजपला फटका बसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. त्यासाठी त्यांनी यापूर्वीच्या निवडणुकीतील मतदानाचे दाखलेही दिले आहेत.
निकालावर प्रतिक्रिया देताना पाटील यांनी शिवसेनेलाही डिवचण्याचा प्रयत्न केला. ‘शिवसेनेनं या निकालांतून बोध घ्यायला हवा, असं त्यांनी म्हटलंय. ‘शिवसेनेनं अमरावतीची जागा गमावली. यात फायदा राष्ट्रवादीचा झाला. पुणे, मराठवाडा पदवीधरची जागा राष्ट्रवादीनं जिंकली. अमरावती शिक्षक मतदारसंघ अप्रत्यक्षरित्या राष्ट्रवादीकडे राहणार आहे. कारण, तिथं पहिल्या क्रमांकावर असलेले उमेदवार अनिल देशमुख यांचे मेहुणा आहेत. ते राष्ट्रवादीतच जातील. काँग्रेसने नागपूर पदवीधर, पुणे शिक्षक मतदारसंघ जिंकला. यात शिवसेनेला काय मिळालं?,’ असा सवाल पाटील यांनी केला. ‘काँग्रेस, राष्ट्रवादी आपली संघटना वाढवतेय. शिवसेनेचं मात्र खच्चीकरण होतंय. शिवसेनेला चुचकारण्याचा किंवा सरकार बनविण्याशी माझ्या या वक्तव्याचा काही संबंध नाही. केवळ जुन्या प्रेमातून सांगतोय,’ असंही ते म्हणाले.