बीड

लसीकरणासाठी महापालिका सज्ज; अशी असेल ब्लू प्रिंट

मुंबई: इंग्लंडमध्ये करोना लस वापरण्यास अनुमती मिळाल्यानंतर देशासह मुंबईतही करोना लसीकरणाच्या चर्चेने नव्याने वेग घेतला आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने वैद्यकीय क्षेत्रातील करोनायोद्धांच्या करोना लसीकरणासाठी सर्व पायाभूत सुविधेची सुसज्ज तयारी केली आहे. महापालिकेने त्याबाबत संपूर्ण आराखडा (ब्लू प्रिंट) तयार केला असून, लशींच्या वाहतुकीसह साठवणूक आणि प्रत्यक्ष लस देण्याच्या पूर्वतयारीवर अखेरचा हात फिरवला जात आहे.

मुंबईत करोना लस सर्वप्रथम वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असलेल्यांना दिली जाणार आहे. त्याप्रमाणे, सरकारी-खासगी क्षेत्रातील रुग्णालये, दवाखाने आदींशी संबंधितांचा संपूर्ण डेटा गोळा करण्यात आला आहे. ती संख्या सुमारे सव्वालाखांपर्यंत असून, त्या सर्वांचे संपर्क क्रमांक, इमेलची यादी अद्ययावत करण्यात आली आहे. तसेच, प्रत्यक्ष लसीकरणाची व्यवस्था मुंबईतील केईएम, सायन, नायर, कूपर अशा चारही वैद्यकीय महाविद्यालयांत दिल्या जाणार आहे. त्याजोडीला गर्दीचे नियोजन करण्यासाठी उपनगरातही प्रत्येकी दोन-दोन ठिकाणांची निवड केली आहे. केंद्र आणि राज्याकडून लसींचा पुरवठा झाला की, त्याची साठवणूक आणि प्रत्यक्ष लस देण्याची जबाबदारी पालिकेकडून पार पाडली जाणार आहे. त्यासाठी पुरेपूर व्यवस्था केली जात आहे.

लस उपलब्ध झाल्यानंतर त्यांचे लसीकरण करण्यासाठी सर्वतोपरी नियोजन केल्याचे मुंबई पालिकेचे अतिरिक्त पालिका आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले. लस साठविण्यासाठी चारही वैद्यकीय महाविद्यालयांत विशेष व्यवस्था असणार आहे. वैद्यकीय महाविद्यालयाप्रमाणेच रक्तपेढ्यांमध्येही तशी व्यवस्था राहील. त्यात मुख्यत: उणे २ ते उणे १८ सेल्सियस अंशांपर्यंत लस साठविण्याची क्षमता आहे. या सगळ्यात प्रशिक्षित मनुष्यबळ हा कळीचा मुद्दा आहे. नेमक्या यासंदर्भात पालिका पूर्णत: सक्षम असून, त्याबाबतचे इथले कौशल्य वादातीत असल्याचेही काकाणी यांनी स्पष्ट केले. या लशी वाहून नेण्याची जबाबदारी पालिकेची असेल. तर, लस साठविण्यासाठी कांजुरमार्ग येथेही पालिकेच्या अखत्यारीतील पाच मजली इमारत निवडण्यात आली आहे. त्यात टप्प्याटप्प्याने तीन मजल्यापर्यंत लस साठविण्याची क्षमता वाढविण्यात येणार आहे.

लस देण्यासाठी नियोजन प्रत्येक केंद्रात करोनाची लस देण्यासाठी प्रत्येक व्यक्तीमागे तिघांचे मनुष्यबळ पुरविले जाणार आहे. आवश्यकतेनुसार त्या पथकांच्या संख्येत वाढ केली जाईल, असेही काकाणी यांनी नमूद केले आहे. अन्य करोनायोद्धांनाही त्याचा लाभ! कालांतराने पोलिसांसह इतर वर्गवारीतील संबंधितांना करोना लस देण्याचा निर्णय झाल्यास त्यानुसार सुविधा पुरविण्यातही पालिका सक्षम ठरणार आहे. भविष्यकालीन गरजा लक्षात घेउन तशा सुविधांमध्ये पालिकेकेडून वाढ केली जाणार आहे. मुंबईत दिवाळीनंतर करोना रुग्णसंख्येत वाढ होण्याची भीती सतत पुढे येत आहे. पण, सध्या तरी रुग्णसंख्या नियंत्रणात आहे. मात्र, असे असले तरीही पुढील काही महिन्यांच्या अनुषगाने पालिकेकडून काळजी घेतली जात आहे.