क्रीडा

अखेर भारताचा ऑस्ट्रेलियावर 13 धावांनी विजय

भारतीय संघाचा परदेशात 7 पराभवानंतर पहिलाच विजय

2 Dece :- भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात कॅनबेरा येथे खेळल्या गेलेल्या एकदिवसीय मालिकेतील तिसऱ्या आणि शेवटच्या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियावर 13 धावांनी विजय मिळवला. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत ऑस्ट्रेलियाला 303 धावांचे आव्हान दिले होते. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाचा संघाला 290 धावा करता आल्या ​​​​​. भारतीय संघाचा परदेशात 7 पराभवानंतर पहिलाच विजय आहे. फेब्रुवारी 2020 मध्ये न्यूझिलंडने भारताला 3 वनडे आणि 2 कसोटी सामन्यान व्हाइट वॉश दिला होता. यानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या आताच्या मालिकेतील सुरुवातीच्या दोन सामन्यात पराभव झाला होता. यासह ऑस्ट्रेलियाने 3 एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत भारताला 2-1ने पराभूत केले.

‘दै.झुंजारनेता’ वर क्लिक करा आणि मिळवा ‘वॉटसअँपवर’ लाईव्ह अपडेटस

शार्दूल ठाकुरने 2 गडी बाद केले. त्याने स्टीव्ह स्मिथला(7) यष्टीरक्षक लोकेश राहुल आणि मोइसेस हॅनरिक्स (22) शिखर धवनच्या हाती झेलबाद केले. तर एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या नटराजनने एक गडी बाद केले. त्याने ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर मार्नस लाबुशानेला 7 धावांवर त्रिफळाचीत केले. याआधी भारतीय कर्णधार विराट कोहली, हार्दिक पंड्या आणि रविंद्र जडेजा यांनी अर्धशतक झळकावले. पंड्या आणि जडेजाने सहाव्या विकेटसाठी 150 धावांची अभेद्य भागीदारी करत भारताचा डाव सावरला. या भागीदारीच्या जोरावर भारतीय संघाने 5 गडी बाद 302 धावा केल्या. भारताकडून पंड्याने सर्वाधिक 92 धावांची आणि जडेजाने 66 धावांची तुफान खेळी केली.

कोहलीने 63 धावा करत वनडे करिअरमधील 60 वे अर्धशतक केले. पंड्याने 6 वे आणि जडेजाने 13 वे अर्धशतक केले. ऑस्ट्रेलियासाठी अॅश्टन अॅगरने सर्वाधिक 2 गडी बाद केले. अॅडम झॅम्पा, सीन अॅबॉट आणि जोश हेजलवुडने प्रत्येकी 1 गडी बाद केला. या मालिकेत पहिल्यांदाच भारतीय संघाची सुरुवाच चांगली झाली नाही. सलामीवीर शुभमन गिल 33 आणि शिखर धवन 16 धावांवर बाद झाले. शुभमनला अॅश्टन अॅगरने पायचीत केले. तर धवनला सीन अॅबॉटने अॅगरच्या हाती झेलबाद केले. शुभमन आणि कोहलीने दुसऱ्या विकेटसाठी 56 धावांची भागीदारी केली. सामन्यात भारताची मधली फळी पुन्हा अपयशी ठरली. संघाने 15 ते 32 षटकांदरम्यान केवळ 71 धावा केल्या आणि 4 गडी गमावले.

या दरम्यान शुभमन गिल (33), श्रेयस अय्यर (19), लोकेश राहुल (5) आणि कोहली बाद झाले. 152 धावांवर अर्धा संघ पव्हेलियनमध्ये परतला होता. यावेळी पंड्याने जडेजासोबत मिळून सहाव्या विकेटसाठी 108 चेंडूत 150 धावांची खेळी करत संघाचा डाव सावरला आणि 302 धावांपर्यंत पोहोचवले. कर्णधार कोहलीने या सामन्या 23 धावा करताच वनडेत सर्वाधिक कमी डावात 12000 धावा बनवण्याचा विक्रम केला आहे. याबाबतही विराटने सचिन तेंडुलकरला मागे टाकले. सचिनने 309 सामन्यांत 300 डावांत हा विक्रम केला होता. तर कोहलीने 251 सामन्यांच्या 242 डावांत हा विक्रम केला.