बीड

लॉकडाउन हवा की नको? ‘या’ देशात मतदानाने झाला निर्णय

लंडन: करोनाच्या प्रादुर्भावाची लाट आल्यानंतर, ब्रिटन सरकारने इंग्लंडमध्ये पुन्हा एकदा लॉकडाउन जारी करण्यात आले होते. या लॉकडाउनची मुदत मंगळवारी संपल्यानंतर संसदेत मतदान झाले. संसदेने लॉकडाउनचे निर्बंध शिथील करताना नव्या नियमांना मंजुरी दिली. सत्ताधारी हुजूर पक्षात बंडखोरी होऊनदेखील पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी लॉकडाउनबाबत नव्या नियमांबाबतचा मांडलेला प्रस्ताव मान्य झाला.

बुधवारपासून ब्रिटनमधील बहुतांशी भागात लॉकडाउनचे नियम शिथील होणार आहेत. सर्व दुकाने, व्यायामशाळा, सलून पुन्हा एकदा सुरू होणार आहेत. त्याशिवाय धार्मिक कार्यक्रम, विवाह सोहळ्यावरील निर्बंध मागे घेण्यात आली आहेत. तर, मर्यादित प्रेक्षकांना क्रीडा स्पर्धांना, खेळाच्या सामन्यांना उपस्थित राहता येणार आहे. लॉकडाउनच्या नव्या नियमांमध्ये मध्यम, कडक आणि अतिकडक अशा स्वरूपातील लॉकडाउन असणार आहे. संबंधित भागात करोनाची असलेला संसर्ग आणि जोखमीच्या आधारे ही तीन स्तरीय रचना ठरणार आहे.

सत्ताधारी हुजूर पक्षाच्या अनेक खासदारांनी या नव्या नियमांना विरोध केला. त्यातील काहीजणांनी या प्रस्तावाच्या विरोधात मतदान केले. या प्रस्तावाच्या बाजूने २९१ मते मिळाली तर विरोधात ७८ जणांनी मतदान झाले. या तीन स्तरीय रचनेनुसार, तिसऱ्या स्तरात २३ दशलक्ष, दुसऱ्या स्तरात ३२ दशलक्ष आणि पहिल्या स्तरात सात लाख लोकसंख्या येणार आहे.

‘देशातील करोनाच्या प्रादुर्भावाची परिस्थिती नियंत्रणात आहे. मात्र, दक्षता गरजेची आहे,’ असे ब्रिटनचे आरोग्यमंत्री मॅट हँकॉक यांनी संसदेतील मतदाना आधी म्हटले होते. करोनाच्या प्रादुर्भावाची लाट आल्यानंतर, ब्रिटन सरकारने इंग्लंडमध्ये पुन्हा एकदा लॉकडाउन जारी करण्यात आले होते. या लॉकडाउनची मुदत मंगळवारी संपत आहे. त्यामुळे, विविध स्तरांवर लॉकडाउनचे नियम लावण्याची गरज व्यक्त करण्यात येत आहे. हँकॉक म्हणाले, ‘करोनाच्या रुग्णांची संख्या कमी झाल्यामुळे, आरोग्य यंत्रणेवरील ताण कमी झाला आहे. प्रादुर्भावाची परिस्थिती नियंत्रणात आली आहे. त्यामुळे इंग्लंडमधील नियम शिथिल करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.