News

योगी आदित्यनाथ- अक्षय कुमार यांच्या भेटीवर संजय राऊतांची प्रतिक्रिया; म्हणाले…

मुंबईः उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर दाखल झाले आहेत. मंगळवारी रात्री त्यांचे मुंबईत आगमन झाले. मुंबईत येताच त्यांनी सर्वप्रथम बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारची भेट घेतली आहे. योगी आदित्यनाथ आणि अक्षय कुमारच्या या भेटीनंतर फिल्मसिटी मुंबई बाहेर नेण्याचा प्रयत्न होत असल्याच्या या चर्चांना उधाण आलं आहे. यावर, शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

उत्तर प्रदेशातील गौतम बुद्ध नगरात यमुना एक्स्प्रेस-वे जवळ चित्रनगरी ( फिल्मसिटी ) उभारण्यात येत आहे. याबाबत योगी यांनी अक्षयकुमारसोबत चर्चा केली. तशी माहिती खुद्द योगी आदित्यनाथ यांनीच ट्वीटरच्या माध्यमातून दिली आहे. या प्रकरणावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना अक्षय कुमार आणि योगी आदित्यनाथ यांच्यावर खोचक टीका केली आहे.

‘योगी आदित्यनाथ यांनी एका ५ स्टार हॉटेलमध्ये अभिनेता अक्षय कुमारची भेट घेतल्याचं मी पाहिलं. ते अक्षय कुमारसोबत बसलेत कारण अक्षय आंब्यांची टोपली घेऊन गेला असेल,’ असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. शिवाय, ‘मुंबईतील फिल्म सिटी कोणी तिकडे नेण्याच्या गोष्टी करत असतील तर तो विनोद आहे. ते इतकं सोप्प नाही. त्याला एक इतिहास आहे,’ असंही राऊत यांनी म्हटलं आहे.

‘योगी आदित्यनाथ यांना मी इतकंच विचारु इच्छितो तुम्ही कोणताही मोठा प्रकल्प तयार करप इच्छिता तर कर. परंतु नोएडामध्ये जी फिल्म सिटी तयार केली होती त्याची आज काय परिस्थिती आहे. त्या ठिकाणी किती चित्रपटांचं चित्रीकरण होतं? याची माहिती जरा त्यांनी द्यावी,’ असा टोला राऊत यांनी लगावला आहे.

‘दक्षिण भारतातील चित्रपट सृष्टी देखील फार मोठी आहे. पश्चिम बंगाल व पंजाबमध्येही फिल्मसिटी आहेत. योगीजी, त्या ठिकाणी जाऊन दिग्दर्शक, कलाकारांशी चर्चा करतील का? का मुंबईतच ते असं करणार आहेत?,’ असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.