News

पंकजाताई, तो त्रास तुझ्या वाट्याला येऊ नये, धनंजय मुंडेंची भावनिक साद

‘पंकजाताई मी स्वतः करोना विषाणूचा त्रास सहन केला आहे, तो त्रास तुझ्या वाट्याला येऊ नये; करोनाविषयक सर्व चाचण्या करून घे. स्वतःची व घरच्यांची काळजी घे. तुला काहीही होणार नाही, लवकर बरी हो. मोठा भाऊ म्हणून मी सोबत आहे,’ अशी भावनिक सादच राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी आपल्या भगिनी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना घातली आहे.

पंकजा मुंडे यांनी स्वतःला सर्दी खोकला व ताप याचा त्रास होत असल्याच्या माहिती ट्विट करीत दिली होती. ‘पंकजा गोपीनाथ मुंडे आपल्याला आव्हान करते की आपण शिरिषजी बोराळकर यांना पहिल्या पसंदीचे मत देऊन विजयी करावे. मला सर्दी खोकला व ताप आहे त्यामुळे मी जबाबदारी स्वीकारून आयसोलेट झाले आहे. अर्थाचे अनर्थ करणाऱ्याकडे दुर्लक्ष करावे आणि बोराळकरांच्या पारड्यात पहिली पसंती टाकावी,’ असे ट्विट पंकजा मुंडे यांनी केले होते. या ट्विट ला कमेंटसह धनंजय मुंडे यांनी री ट्विट केले असून पंकजा मुंडे यांना काळजी घेण्याचे सांगत एकप्रकारे भावनिक सादच घातली आहे.

दरम्यान, जून महिन्यात धनंजय मुंडे यांना करोनाची लागण झाली होती. त्यावर त्यांनी मात केली. करोना आजारात होणारा त्रास मुंडे यांनी अनुभवला आहे. त्यातूनच त्यांनी पंकजा मुंडे यांना काळजी घेण्याचा सल्लाही दिला आहे.