News

सोन्याची झळाळी उतरणार! 2021 च्या सुरुवातीला 42000 रुपयांवर येणार सोन्याचे भाव

नवी दिल्ली, 01 डिसेंबर: सोन्याची झळाळी पुढील दोन महिन्यांमध्ये खूप कमी होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. ऑगस्ट महिन्यात सोनं सर्वोच्च स्तरावर अर्थात प्रति तोळा 52,200 रुपयांवर होतं. त्यांनंतर आता जवळपास सोन्याचे दर (Gold Rates) 8000 रुपयांनी कमी झाले आहेत, केवळ नोव्हेंबरमध्येच सोनं 4000 रुपये प्रति तोळाने उतरलं आहे. सोन्यामध्ये सुरू असलेली घसरण अशीच सुरू राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 2021 या वर्षातील सुरुवातीच्या दोन महिन्यात सोन्याचे दर प्रति तोळा 42,000 हजारांच्या आसपास जाण्याची शक्यता आहे.

काय आहे कारण?

कोरोना संकट काळात गुंतवणूकदारांचा सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे सर्वाधिक कल होता. आता कोरोना वॅक्सिन लवकरच येणार असल्याच्या सकारात्मक बातम्यांमुळे, रुपया मजबूत झाला आहे, तसंच शेअर बाजारातही तेजी आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांनी सोन्यातील गुंतवणूक काढून ती इतर ठिकाणी लावण्यास सुरूवात केली आहे. त्यातच सणासुदीच्या काळात सोन्यातील गुंतवणूक वाढेल अशी अपेक्षा होती, पण गुंतवणूकदारांनी म्हणावी तशी गुंतवणूक यावर्षी केली नाही आहे. या सर्वच कारणांमुळे गगनाला भिडलेले सोन्या-चांदीचे दर आता घसरले आहेत. सध्या या दरात वाढ होण्याची कोणतीही चिन्ह नसल्याचं जाणकारांचं म्हणणं आहे.

फेब्रुवारी 2021 पर्यंत सोन्याचे दर 42000 रुपये प्रति 10 ग्रॅम पर्यंत पोहचण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. तर चांदीच्या दरातही घसरणीचा ट्रेंड सुरुच राहील, असं जाणकारांचं म्हणणं आहे.

रशियाच्या स्पुतनिक व्ही लशीसंदर्भात बातमी येताच सोनं उतरलं आहे. त्यातच केंद्र सरकारने सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाकडून कोरोना वॅक्सिनचे जवळपास 40 कोटी डोस खरेदी करण्याची चर्चा केली आहे. त्यामुळे बाजारात स्थिरता येईल आणि गुंतवणूकदार, सोन्यात गुंतवणूक न करता दुसऱ्या पर्यांयाकडे वळतील अशी अपेक्षा आहे. डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या मजबूतीमुळेही सोन्याच्या किंमतीत घसरण होत आहे.

ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सोन्याचा दर उच्चांकी पातळीवर होता. 7 ऑगस्ट रोजी सोन्याचा भाव 56,200 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. 4 डिसेंबरची वायदे किंमत 48,106 रुपये  प्रति तोळा झाली आहे. सोमवारी दिल्लीतील सराफा बाजारात सोन्याचा भाव 47,483  रुपये प्रति तोळा इतका होता. हे सोन्याचे दर ऑगस्ट महिन्यातील उच्चांकी स्तरानंतर आतापर्यंत जवळपास 8000 रुपये प्रति तोळाने घसरले आहेत. चांदीचा भाव 10 ऑगस्ट रोजी प्रति किलोग्रॅम 78,256 रुपये इतका होता. जो सोमवारी 30 नोव्हेंबर रोजी 57,808 रुपये प्रति किलोग्रॅमवर आला आहे. त्यामुळे ऑगस्टपासून आतापर्यंत चांदीच्या किंमती साधारण 20 हजार रुपये प्रति किलोग्रॅमहून अधिक दराने उतरल्या आहेत.