गरजूंसाठी क्रिकेटचा देव धावला! सचिनने दिला 6 राज्यातल्या मुलांवर उपचारासाठी निधी
मुंबई, 1 डिसेंबर : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) याने आपण दुसऱ्या इनिंगमध्येही भारतासाठी बॅटिंग करू, असं निवृत्त होताना सांगितलं होतं. आपल्या या विधानाला जागत सचिनने पुन्हा एकदा सामाजिक भान जपलं आहे. सचिन तेंडुलकरने त्याच्या फाऊंडेशनच्या मदतीने 6 राज्यांमधल्या 100 गरीब विद्यार्थ्यांच्या उपचाराचा खर्च उचलला आहे. महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, आसाम, कर्नाटक, तामीळनाडू आणि आंध्र प्रदेशच्या विद्यार्थ्यांची मदत सचिन करणार आहे. नोव्हेंबर 2019 सालापासून सचिन त्याच्या फाऊंडेशनच्या माध्यमातून हे सामाजिक काम करत आहे.
सचिन मुंबईमध्ये आधीपासूनच गरजू मुलांसाठी एसआरसीसी हॉस्पिटलच्या माध्यमातून उपचार करत आहे. एकम फाऊंडेशनच्या मदतीने सरकारी आणि ट्रस्टच्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेणाऱ्या गरजू मुलांना सचिन आर्थिक मदत करतो. अनेकवेळा गरीब मुलांच्या पालकांना त्यांच्या गंभीर उपचारांसाठीचा खर्च करणं परवडत नाही, अशा गरजू मुलांचा उपचारासाठीचा खर्च सचिन उचलतो.
या महिन्याच्या सुरुवातीला सचिनने ईशान्य भारतातल्या आसाम, मिझोराम आणि त्रिपुरा या भागात मुलांच्या उपचारासाठी लागणारी साहित्य पुरवली होती. याचा फायदा एका वर्षात दोन हजार मुलांना होणार आहे. सचिनने युनीसेफच्या जागतिक बालदिनानिमित्त झालेल्या कार्यक्रमातही सहभाग नोंदवला होता. जगाचं भविष्य घडवण्यासाठी मुलांना प्रोत्साहन देण्यासाठीचा हा कार्यक्रम होता.