बीड

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉ. शीतल आमटे यांची आत्महत्या

चंद्रपूर, 30 नोव्हेंबर : ज्येष्ठ समाजसेवक स्व. बाबा आमटे (Baba Amte) यांची नात आणि महारोगी सेवा समितीच्या CEO डॉ. शीतल आमटे (dr sheetal amte) यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आनंदवन येथील राहत्या घरी विष घेवून शीतल आमटे यांनी जीवन यात्रा संपवली आहे.

डॉ.शीतल आमटे यांनी आज सकाळी आनंदवन येथील आपल्या राहत्या घरी आत्महत्या केली आहे. शीतल आमटे यांच्या आत्महत्येमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. शीतल आमटे यांचा मृतदेह ताब्यात घेतला असून शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला आहे.

शीतल आमटे सध्या आनंदवनची संपूर्ण जबाबदारी सांभाळत होत्या. बाबा आमटे यांच्या तिसऱ्या पिढीचे नेतृत्व त्या करीत होत्या.  मागील काही महिन्यांपासून आमटे परिवारात अंतर्गत संघर्ष पेटला होता. हा वाद अनेकदा चव्हाट्यावरही आला. या सर्व वादाच्या केंद्रस्थानी शीतल होत्या, असा आरोप वेळोवेळी झाला.

हा अंतर्गत गृहकलह सुरू असतानाच आज त्यांच्या आत्महत्येचे वृत्त आले. विषाचे इंजेक्शन त्यांनी घेतल्याची माहिती समोर येत असून, हे विष घेतल्यावर त्यांना तातडीने वरोरा येथील उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले, पण शेवटी त्यांची प्राणज्योत मालवली.

काही दिवसांपूर्वी  शीतल आमटे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून महारोगी सेवा समितीच्या लोकांवर गंभीर आरोप केले होते. त्यांच्या या आरोपांमुळे एकच खळबळ  उडाली होती. त्यानंतर डॉ. विकास, प्रकाश, मंदा आणि भारती यांनी पत्र काढून त्यांचे आरोप फेटाळले होते.

कुष्ठरोग्यांच्या आयुष्यात आनंद पेरणाऱ्या आनंदवनमध्येच ही धक्कादायक घटना घडल्याने सामाजिक वर्तुळ हादरले आहे.