बीएचआर घोटाळ्याचे धागेदोरे गिरीश महाजनांपर्यंत?
जळगाव: बीएचआर क्रेडीट सोसायटीमधील अवसायकाच्या काळातील गैरव्यवहाराच्या गुन्ह्यातील संशयित उद्योजक सुनील झंवर याच्या खान्देश काम्प्लेक्समधील कार्यालयात माजी मंत्री महाजन यांच्या लेटरपॅडसह कागदपत्र सापडल्याचे वृत्त आहे. तसेच याच कार्यालयातून महापालिकेचा स्वच्छतेचा मक्ता असलेल्या वाटरग्रेस कंपनीची कागदपत्रे तसेच मक्तेदाराच्या कर्मचाऱ्यांची एटीएम कार्ड मिळाल्याची माहीती आहे. दरम्यान कागदपत्रे सापडली आहेत मात्र, ती कुणाशी संबधित आहे याचा तपास करीत असल्याची माहिती आर्थिक गुन्हे शाखेच्या तपास अधिकाऱ्यांनी दिली आहे. दुसरीकडे गुन्ह्याती संशयित सुनिल झंवर, अवसायक जितेंद्र कंडारे यांच्यासह सहा जणांचा शोध पोलिसांकडून सुरू आहे. दरम्यान या संदर्भात गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया घेण्यासाठी संपर्क केला असता, तो होवू शकला नाही.
शहरातील भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टी-स्टेट को ऑपरेटीव्ह क्रेडीट सोसायटीत अवसायकाच्या काळात झालेल्या गैरव्यवहाराच्या पुणे येथे दाखल असलेल्या गुन्ह्याच्या अनुषंगाने शुक्रवारी पुणे येथिल आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापे टाकून चौकशीला सुरुवात केली आहे. आर्थिक गुन्हे शाखेच्या उपायुक्त भाग्यश्री नवटके यांच्या पथकाकडून करून सुरू करण्यात आलेली तपासणी आज तिसऱ्या दिवशी देखील सुरू होती. या प्रकरणी उद्योजक माजी मंत्री गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय सुनील झंवर यांच्या गुन्हा दाखल झाल्यानंतर प्रचंड खळबळ उडाली आहे.
झंवर यांच्या कार्यालयातून दस्तऐवज जप्त
आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने आज सकाळपासून जळगाव शहरातील खान्देश कॉम्प्लेक्समधील सुनील झंवर यांचे रमेश ड्रायव्हिंग स्कूलच्या कार्यालयात तपासणी सुरु केली. याठिकाणी पोलिसांना महापालिकेचा स्वच्छतेचा मक्ता घेतलेल्या वॉटरग्रेस कंपनीची कागदपत्रे तसेच कर्मचाऱ्यांचे एटीएम कार्ड सापडल्याचे समजते. यासह माजी मंत्री गिरीश महाजन यांचे लेटर पॅड सापडल्याची जोरदार चर्चा असल्याने या प्रकरणाचे धागेदोरे महाजनांपर्यंत जावून पोहचतात की काय? अशी शक्यता निर्माण झाली आहे. याबाबत आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकारी यांनी कागदपत्रे हस्तगत केली आहेत. मात्र, ती कुणाशी संबधित आहेत, ते आताच सांगता येणार नसल्याची माहती दिली आहे.
हे तर घुकुलापेक्षाही मोठे घबाड – डॉ. विजय पाटील
जळगाव महापालिकेतील घरकुल घोटाळ्याचे मूळ तक्रारदार नरेंद्र पाटील यांचे बंधू अॅड. विजय पाटील यांनी काल रात्री आर्थिक गुन्हे शाखेच्या उपायुक्त भाग्यश्री नवटके यांची भेट घेतली होती. या गुन्ह्यात पोलिस प्रशासनाला तपासात सहकार्य करण्यासाठी गरज पडल्यास त्रयस्थ अर्जदार म्हणून भूमिका घेण्याची तयारी दाखविल्याची माहीती विजय पाटील यांनी मटाशी बोलतांना दिली. बीएचआर क्रेडीट सोसायटीत गैरव्यवहार झाल्यानतंर सन २०१५ मध्ये अवसायकाची नेमणूक करण्यात आली. मात्र, अवसायकांनी राजकीय हस्कक असलेच्या उद्योजकांच्या सहकार्याने त्यापेक्षा देखील मोठा गैरव्यवहार केला आहे. घरकुलाचा गैरव्यवहार ४० कोटीचा होता, मात्र, अवसायकाच्या काळात बीएचआरमध्ये झालेला गैरव्यवहार हा ११०० कोटीपेक्षा जास्त असल्याचे घरकुलापेक्षाही मोठे घबाड असल्याचे अड. विजय पाटील यांनी सांगीतले.
ठेवीदारांना ३० टक्के रक्कम देवून लाटल्या पावत्या
बीएचआरच्या कर्जदारांच्या जप्त केलेल्या मालमत्ता अगदी कवडीमोल भावात खरेदी करण्यात आलेल्या आहेत. ठेवीदारांना केवळ ३० टक्के रक्कम देवून त्यांच्याकडून ठेवीच्या पावत्या घेतल्या जायच्या त्यानतंर व्याजासह शंभर टक्के पैसे संस्थेतून कींवा त्या पावत्यांच्या बदल्यात मालमत्ता घ्यायचा हा गोरखधंदा असल्याचेही विजय पाटील यांनी सांगीतले. त्यामुळे शंभर रुपयांची मालमत्ता त्यांन ५ ते १० रुपयात मिळात होती, तर गरिब ठेवीदारांना त्यांच्या मूळ ठेवीच्या केवळ ३० रक्कम मिळत असल्याचेही विजय पाटील यांनी सांगीतले.
झंवर यांच्या कार्यालयात बसून अवसायक करायचे काम
या गुन्ह्यात आरोपी केलेल्या सुनिल झंवर माजी मंत्री गिरिश महाजन यांचे निकटवर्तीय आहेत. त्यांनी बीएचआरची एक वेबसाईट त्यांच्या कार्यालयात तयार केली होती. या वेबसाईटवरुनच झंवर यांना बीएचआर व कर्जदारांच्या कुठल्या मालमत्ता विक्री करायच्या आहेत ते समजत होते. बीएचआरचे अवसायक जितेंद्र कंडारे हे संस्थेच्या कार्यालयात न जाता झंवर यांच्या कार्यालयातच बसून काम पाहत होते, असा धक्कादायक आरोप देखील विजय पाटील यांनी केला आहे. बीएचआरमधील तक्रारी मागील अनेक वर्षापासून केल्या होत्या. मात्र, मागील भाजप सरकारमधील मंत्र्यांचेच हस्तक यात गुंतलेले असल्याने त्याची दखल घेतली गेली नसल्याचाही आरोप अड पाटील यांनी केला आहे. घोटाळा संपूर्ण महाराष्ट्रातील असून यात राज्यातील अनेक मोठे राजकारणी अडचणीत येण्याची शक्यताही पाटील यांनी वर्तविली आहे.
सुनील झंवरांसह संशयितांच्या शोधाचा रोख नाशिककडे
जळगावात सुनिल झंवर यांचे कार्यालय, बीएचआर संस्थेचे मुख्य कार्यालय तसेच संशयितांच निवासस्थाने येथून कागदपत्रांची तपासणी व हस्तगत करण्याचे काम सुरुच आहे. दुसरीकडे या गुन्ह्यात नावे वाढविलेल्या संस्थेचे अवसायक जितेंद्र कंडारे, प्रकाश वाणी, कुणाल शहा, सुनील झंवर, योगेश सांखला व माहेश्वरी यांचा देखील शोध सुरु आहे. यांच्या शोधाचा रोख नाशिक व त्र्यंबकेश्वरकडे असल्याचे समजते.
ट्रकभर कागदपत्रे, संगणक व हार्डडिस्क पुण्याकडे
जळगाव शहरातील बीएचआर पतसंस्था व संशयितांच्या निवासस्थानातून तसेच कार्यालयांमधून आर्थिक गुन्हेशाखेच्या पथकांनी जप्त केलेले दस्ताऐवज, संगणक, हार्डडिस्क यासह विविध प्रकारच्या फाईली असा सुमारे ट्रकभर सामान पुण्याकडे तपासासाठी रवाना करण्यात आलेला आहे.
अवसायक कंडारेच्या घरातून लाखोचे घबाड जप्त
दरम्यान काल रात्री तपास पथकाने अवसायक कंडारेच्या घरातून ९ लाख ७८ हजार रुपयांची रोकड, २१ लाख ९२ हजार ८४० रुपयांचे सोन्याचे दागीने व ३ लाक ३४ हजार रुपये कींमतीच्या चांदीच्या वीटा जप्त करण्यात आल्याची माहीती पुणे न्यायालयात तपास अधिकाऱ्यांनी सादर केली.
झंवर याच्या कार्यालयात शासकीय अधिकाऱ्यांचे शिक्के
या गुन्ह्यातील संशयित सुनिल झंवर याच्या कार्यालयात एक पिशवी भरुन शासकीय अधिकारी व कर्मचारी यांचे शिक्के देखील सापडले आहेत. यात जिल्हाधिकारी, शिक्षणअधिकारी ते मुख्याध्यापकापर्यंत अनेकांचे शिक्के आढळून आल्याची माहीती आहे.
हे तर केवळ हीमनगाचे टोक- एकनाथ खडसे
बीएचआर संस्थेच्या चौकशी समोर येत असलेला हा प्रकार केवळ हीमनगाचे टोक आहे. येत्या आठ दिवसात आणखी बरेच बाहेर येईल, अशी प्रतिक्रीया एकनाथ खडसे यांनी मटाशी बोलतांना दिली. खा. रक्षा खडसे, अड. कीर्ती पाटील यांनी सन २०११ पासून याबाबत राज्य व केंद्र शासनाकडे तक्रारी केल्या आहेत. आतापर्यंत १६ तक्रारी केल्या असल्याचेही खडसे यांनी सांगीतले. यात मोठ्या मंडळींची देखील नावे बाहेर येणार असल्याचेही खडसे यांनी सांगितले.