ठाण्यातील ‘त्या’ हत्याकांडाचा लावला छडा; महिलेने दिली होती दुसऱ्या महिलेला ‘सुपारी’
ठाणे : मालमत्तेसंबंधित काम पाहणाऱ्या तानाजी जावीर यांची हत्या याच महिलेने अन्य एका महिलेला एक लाख ४० हजारांची सुपारी देऊन केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. जुलैमध्ये झालेल्या या हत्याकांडाची उकल करण्यात चार महिन्यानंतर कासारवडवली पोलिसांना यश आले असून या प्रकरणी दोन महिलांसह एकूण चार जणांना अटक करण्यात आली आहे.
गेल्या १२ वर्षांपासून बळीराम नागलकर यांच्या घरी तानाजी जावीर वाहनचालक म्हणून तसेच मालमत्तेची देखभाल करण्याचे काम करत होते. परंतु १७ जुलै रोजी ते घोडबंदर भागातील नागलाबंदर परिसरातून अचानक बेपत्ता झाले. भाऊ अनिल जावीर यांच्या तक्रारीनंतर कासारवडवली पोलिसांनी तानाजी यांचा शोध घेण्यासाठी तीन पथके तयार केली. चौकशीमध्ये तानाजी यांची हत्या झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांनी आरोपींची धरपकड सुरू केली. सुरुवातीला कल्याणमधून संतोष घुगरे याला ताब्यात घेतले. त्याच्या चौकशीमध्ये मंगेश मुरुडकर याच्या मदतीने तानाजीची १७ जुलै रोजी हत्या केल्याची बाब समोर आली. मंगळवारी कासारवडवली पोलिस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी आरोपींची धरपकड सुरू केली होती. घुगरे, मुरुडकर यांच्यासह गीता आरोळकर आणि कल्पना नागलकर या दोन महिलांनाही अटक केली. चौघांनाही न्यायालयाने शनिवारपर्यंत पोलिस कोठडी दिली आहे.
या चौकशीमध्ये आणखी धक्कादायक बाबींचा उलगडा झाला आहे. तानाजी कल्पनाच्या मालमत्तेचे काम पाहत होता. परंतु मालमत्तेच्या वादातून त्यांच्यात सतत भांडणे होत असत. त्यामुळे तानाजीचा काटा काढण्यासाठी कल्पनाने गीताला एक लाख ४० हजारांची सुपारी दिली. त्यानंतर संतोष आणि मंगेश या दोघांनी तानाजीला दारू पिण्याच्या बहाण्याने गायमुख खाडी येथे बोलवले आणि दारूमध्ये विषारी औषध मिसळून तानाजीची हत्या केली. नंतर मृतदेह गायमुख खाडीकिनारी निर्जन स्थळी फेकून केला. मृतदेहाचे अवशेष आणि कपडे जप्त करण्यात आले आहेत. संतोषला या कामाचे काही पैसे मिळाले असल्याची बाब चौकशीमध्ये निष्पन्न झाली आहे. कासारवडवली पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक किशोर खैरनार यांच्या नेतृत्वाखाली पोलिस निरीक्षक अविनाश काळदाते, जयराज रणवरे, सहाय्यक पोलिस निरीक्षक सागर जाधव, पोलिस उप निरीक्षक कुलदीप मोरे यांच्या पथकाने या गुन्ह्याची उकल केली.