बीड

नामनिर्देशित आमदार नियुक्तीला विलंब का? राजू शेट्टींचा राज्यपालांना थेट सवाल

पुणे, 22 नोव्हेंबर: राज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादीवर अजूनही शिक्कामोर्तब नाही. ही यादी जाहीर करण्याबाबत राज्यपालांकडून राजकारण केलं जात असल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या (Maharashtra Government)मंत्र्यांनी केला आहे. आता त्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी (Swabhimabi Shetkari Party leader Raju Shetti) यांनी उडी घेतली आहे.

नामनिर्देशित आमदार नियुक्तीला विलंब का, असा थेट सवाल राजू शेट्टी यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Maharashtra Governer Bhagatsing Koshari) यांनी केला आहे.

राजू शेट्टी म्हणाले, विधान परिषदेच्या 12 जागांसाठी आम्ही सर्व उमेदवार राज्यघटने निर्धारित केलेल्या निकषात बसत असतानाही राज्यपालांकडून का विलंब केला जात आहे, हे कोडं उलगडत नाही. त्यामुळे यामागे काही राजकारण आहे का, हेही तपासलं पाहिजे, अशी शंका देशी राजू शेट्टी यांनी उपस्थित केली आहे.

राष्ट्रपतीकडून नामनिर्देशित सदस्य राज्यसभेवर जाऊ शकतात, मग राज्यपालांकडून विधान परिषदेच्या 12 सदस्यांना विलंब का होत आहे, असंही राजू शेट्टी यांनी यावेळी सांगितलं आहे.

सदाभाऊ खोतांच्या आरोपांवर प्रत्युत्तर…

काही लोकांना माझं नाव घेतल्याशिवाय चैन पडत नाही, त्यांच्याकडे दुर्लक्ष करायला हवं, अशा शब्दांत राजू शेट्टी यांनी सदाभाऊं खोतांच्या आरोपांना यावेळी प्रत्युत्तर दिलं आहे.

‘त्या’ तरुणांच्या मृत्यूस वीज कंपनीच जबाबदार

जालन्यात वीजेच्या शॉक लागून तीन तरुणांचा नाहक बळी गेला. तरुण शेतकऱ्यांच्या मृत्यूला वीज कंपनीचा गलथानपणाच जबाबदार आहे. त्यामुळे यापुढे आता शेतकऱ्यांना दिवसा लाईट द्यावी, अशी मागणी राजू शेट्टी यांनी केली आहे.

दरम्यान, महाविकास आघाडीकडून 21 नोव्हेंबरला यादी जाहीर करण्याबाबत करण्यात आलेल्या विनंतीची मुदत 21 नोव्हेंबरला संपली. तरी राजभवनाकडून यादी जाहीर करण्याबाबत अद्याप काहीच माहिती मुख्यमंत्री कार्यालयाला देण्यात आलेली नाही. त्यामुळे या मुद्यावरून महाविकास आघाडी सरकारविरुद्ध राज्यपाल, असा पुन्हा एकदा संघर्ष पाहायला मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.

राज्यपाल नियुक्त आमदारांवर अजूनही शिक्कामोर्तब नाही…

महाविकास आघाडी सरकारने राज्यपालांकडे विनंती केली होती पुढील 15 दिवसांत मंजुरी मिळावी म्हणून, ही विनंती आहे. हा काही कायदा नाही. या संदर्भात राज्यपालांनी कोणताही निर्णय घेतलेला दिसत नाही. त्यामुळे महाविकास आघाडीचे नेते एकत्र बैठक घेऊन लवकरच निर्णय घेतील, अशी माहिती अनिल परब यांनी दिली.

महापालिकेवरून भाजपवर हल्लाबोल

‘महापालिका निवडणुकांना सव्वा वर्ष आहे. त्या संदर्भात पक्षाचे नेते एकत्र बसून निर्णय घेतील. शिवसेना निवडणुकीसाठी जन्माला आलेला पक्ष नाही. शिवसेनेचे काम नेहमीच सुरू असतं. निवडणुका असो अथवा नसो…शिवसेना पक्ष प्रमुख शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून नेहमीच माहिती घेत असतात.

निवडणुका आल्या की छत्र्या उघडायच्या, असा पक्ष शिवसेना नाही. शिवसेनेचं काम 365 दिवस सुरूच असतं. शिवसेनेची तयारी नेहमीच असते. ज्यांनी स्वप्नं बघितली आहेत, त्यांचा स्वप्नंभंग झाला की आम्ही बोलूच,’ असं म्हणत शिवसेनेच्या अनिल परब यांनी भाजपच्या ‘मिशन मुंबई’वर घणाघात केला आहे.