बीड

काँग्रेसचा ऐतिहासिक निर्णय, डिजिटल माध्यमातून होणार अध्यक्षाची निवड

नवी दिल्ली : देशातील सर्वात जुन्या राजकीय पक्ष असलेल्या काँग्रेसनं एक ऐतिहासिक निर्णय घेतलाय. काँग्रेसचा पुढचा अध्यक्ष हा डिजिटल माध्यमाद्वारे निवडला जाणार आहे. (Digital Voting in Congress President Election)

काँग्रेसच्या नव्या अध्यक्षाची निवडणूक डिजिटल माध्यमाद्वारे पार पडणार असल्याचं पक्षाकडून घोषित करण्यात आलंय.

त्यानंतर, ऑल इंडिया काँग्रेस कमिटी (AICC) च्या सदस्यांकडून डिजिटल आयडी कार्ड उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलीय.

पक्षातील ‘सेंट्रल इलेक्शन अथॉरिटी’ मतदारांची यादी बनवण्याचं काम सुरू आहे. अथॉरिटीकडून स्टेट युनिटसकडे एआयसीसी प्रतिनिधींचा डिजिटल फोटो मागवण्यात आला आहे. जवळपास १५०० प्रतिनिधी या निवडणुकीत सहभागी होणार आहेत.

विरोधकांकडून राहुल गांधी यांच्यासाठी एका नव्या मंचाची तयारी केली जात असल्याचं म्हटलं जातंय. परंतु, अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत राहुल यांच्याऐवजी इतर कुणी उभं राहीलं तर उत्सुकता नक्कीच ताणली जाईल.

काँग्रेसच्या काही नेत्यांच्या म्हणण्यानुसार, राहुल गांधी हेच पुन्हा एकदा पक्षाचे अध्यक्ष म्हणून निवडून आले तर ते केवळ निर्विवाद नेता नाहीत तर सर्वात लोकप्रिय नेतेदेखील आहेत, असा संदेश जनतेपर्यंत पोहचू शकतो.

अध्यक्षपदाच्या दावेदारांत वाढ झाली तर सेंट्रल इलेक्शन अथॉरिटीला ही संपूर्ण निवडणूक प्रक्रिया वेळेतच पूर्ण करावी लागेल. यात बॅलेट मतदानाचाही समावेश आहे.

दोन राज्य सोडून देशातील इतर सर्व राज्यांतील प्रतिनिधींची यादी आमच्यापर्यंत पोहचली आहे. निवडणुकीची सगळी तयारी पूर्ण झाल्यानंतर त्याची काँग्रेस अध्यक्षांना माहिती देण्यात येईल, असं निवडणुकीशी निगडीत नेत्यांनी माहिती दिलीय.

एआयसीसी प्रतिनिधींची यादी २०१७ प्रमाणेच असेल. यादीत काही बदल आणि सुधारणेचं काम सुरू आहे. यंदा प्रत्येक प्रतिनिधिच्या आयडी कार्डवर एक बारकोडही राहणार आहे. त्यावर, प्रत्येक मतदात्याची संपूर्ण माहिती असेल. लवकरच हे पक्षाचं मतदार कार्ड नेत्यांना पाठवण्यात येईल.

या निवडणुकीत निवडून येणारा नेता पक्षाच्या सध्याच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांची जागा घेणार आहे. काँग्रेसच्या अध्यक्षाचा कालावधी दोन वर्षांचा असेल.

२०१७ साली राहुल गांधी यांची पक्षाचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली होती. मात्र, राहुल गांधी यांनी स्वत: राजीनामा दिल्यानंतर सोनिया गांधी यांच्याकडे पुन्हा ही जबाबदारी सोपवण्यात आली होती.