बीड

ठाणेकरांसाठी सर्वात मोठी बातमी; नगरविकास मंत्र्यांनी दिले ‘हे’ आदेश

मुंबई:ठाणे आणि एमएमआर प्रदेशातील अन्य शहरांची गेल्या काही वर्षांत झपाट्याने वाढ झाली असून त्या तुलनेत येथील पायाभूत सुविधा विकासांचे प्रकल्प प्रलंबित आहेत. त्यामुळे या संपूर्ण परिसराच्या विकासाला चालना देणारे प्रकल्प फास्ट ट्रॅकवर आणण्याचे निर्देश नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी एमएमआरडीएला दिले आहेत. ( Eknath Shinde On Thane and MMR Region Development Projects )

पूर्व मुक्त मार्गाचा घाटकोपर पासून ठाण्यापर्यंत विस्तार, तीन हात नाका रिमॉडेलिंग, आनंद नगर नाका ते साकेत एलीव्हेटेड महामार्ग, कोपरी ते पटणी खाडी पूल, कोलशेत ते गायमुख खाडी मार्ग तसेच कोलशेत, कासारवडवली आणि गायमुख येथे खाडीपलिकडील भागांना जोडणारे खाडी पूल, नवीन ठाणे ग्रोथ सेंटर आदी महत्त्वाच्या प्रकल्पांचा समावेश यात आहे. या सर्व प्रकल्पांच्या जलद अंमलबजावणीसाठी नोडल अधिकाऱ्याची नियुक्ती करण्याचे निर्देशही शिंदे यांनी एमएमआरडीए आयुक्त आर. ए. राजीव यांना दिले आहेत.

एकनाथ शिंदे आणि राजीव यांच्या समोर या सर्व प्रकल्पांचे सविस्तर सादरीकरण झाले. ठाण्याचे आमदार या नात्याने शिंदे स्वतः गेली अनेक वर्षे सातत्याने या प्रकल्पांचा पाठपुरावा राज्य सरकार आणि एमएमआरडीएकडे करत होते. पुणे, नाशिक, अहमदाबाद, जेएनपीटी अशा विविध ठिकाणांकडे जाणारी सर्व वाहतूक ठाणे शहरातून जात असल्यामुळे ठाण्यातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत आहे. नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाचा शेवट ठाण्याजवळ होणार आहे, तसेच भिवंडी व कल्याण परिसरात एमएमआरडीएमार्फत ग्रोथ सेंटर विकसित करण्यात येणार असल्यामुळे वाहतुकीची समस्या अधिकच बिकट होणार आहे. या बाबी लक्षात घेऊन या प्रकल्पांची आखणी करण्यात आली आहे.

ठाणे, कल्याण, डोंबिवली, भिवंडी आदी परिसरातील नागरिक गेली काही वर्षे वाहतूककोंडीमुळे त्रस्त आहेत. या सर्व प्रकल्पांसाठी गेली अनेक वर्षे आपण सातत्याने पाठपुरावा करत होतो. या प्रकल्पांमुळे वाहतूक कोंडीची समस्या कायमस्वरूपी निकाली निघेल, असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला. भविष्यातील वाढ लक्षात घेऊन या सर्व प्रकल्पांचे नियोजन केले असल्याचेही त्यांनी सांगितले.

ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रोचा सुधारित आराखडा लवकरच

ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो मार्गाच्या भिवंडी ते कल्याण टप्प्याच्या आरेखनाबाबत असंख्य तक्रारी होत्या. कल्याणचा फार थोडा भाग मेट्रोने जोडला जाणार असल्यामुळे बहुसंख्य कल्याणवासीय या मेट्रोपासून वंचित राहिले असते. त्यामुळे या मार्गाचे आरेखन बदलण्याचे निर्देश शिंदे यांनी एमएमआरडीएला दिले होते. सुधारित आरेखन तयार करण्यात आले असून या प्रकल्पाला गती देण्याचे निर्देशही शिंदे यांनी यावेळी दिले.