पंकजाताईंनी केले ऊसतोड कामगारांना ‘हे’ आवाहन
ऊसतोड कामगारांच्या संपात राजकारण होत आहे- पंकजाताईं
24 Oct :- ऊसतोड कामगारांच्या मजुरीमध्ये वाढ मिळावी म्हणून मागच्या अनेक दिवसांपासून ऊसतोड कामगार संपावर आहेत. मात्र, आता ऊसतोड कामगारांच्या मजुरीमध्ये किमान 21 रुपयांच्या पुढे दरवाढ मिळाली पाहिजे, अशी मागणी करुन पंकजा मुंडे यांनी कामगारांना आता ऊसतोडीसाठी निघण्याचे आवाहन केले आहे. भाजपच्या राष्ट्रीय सचिव पदी निवड झाल्यानंतर पंकजा मुंडे यांचा जाहीर सत्कार केज आमदार नमिता मुंदडा यांच्याकडून ठेवण्यात आला होता. त्या सत्कार समारंभामध्ये बोलताना पंकजा मुंडे यांनी ऊसतोड कामगारांच्या संपाबद्दल दरामध्ये आपली भूमिका जाहीर केली आहे.
‘दै.झुंजारनेता’ वर क्लिक करा आणि मिळवा ‘वॉटसप्पवर’ लाईव्ह अपडेटस
कारखानदारांनी ऊसतोड कामगारांसाठी आतापर्यंत काहीच केले नाही. आता एवढी तरी दानत ठेवावी अशी अपेक्षा यावेळी पंकजा मुंडे यांनी येथे व्यक्त केली. ऊसतोड कामगारांच्या संपात राजकारण होत आहे, त्यांना वेठीस धरण्याचा प्रकार होत असल्याने हा विषय आता इथेच संपवावा आणि कामगारांनी ऊसतोडीसाठी निघावे असे आदेशही त्यांनी दिले आहेत. ऊसतोड कामगारांच्या संपाबाबत दुर्गाष्टमीपर्यंत निर्णय घ्यावा अशी मागणी पंकजा मुंडे यांनी नुकतीच केली होती. परंतु यात तोडगा न निघाल्याने त्यांनी आपली पुढील भूमिका स्पष्ट केली.
वाचा :- ‘या’ प्रकारे साजरा होणार शिवसेनेचा ‘ऑनलाईन’ दसरा मेळावा
ऊसतोड कामगारांच्या संपाचा विषय पूर्वी लोकनेते मुंडे साहेब आणि शरद पवार यांच्या लवादात मिटायचा. आता या लवादात मी आणि जयंत पाटील आहोत. कामगारांच्या मागण्यांसाठी मी साखर संघ, जयंत पाटील यांच्याशी सातत्याने पाठपुरावा केला. हा प्रश्न सप्टेंबरमध्येच मिटला असता पण हा लवाद असूच नये असे म्हणणाऱ्यांनी यात ठरवून राजकारण केले, त्यामुळे विनाकारण वातावरण दुषित झाले आणि त्याचा त्रास माझ्या कामगारांना सहन करावा लागतोय असे पंकजा मुंडे म्हणाल्या.कारखानदार व कामगारांत समन्वय साधला जावा यासाठीच हा लवाद आहे. मला यात कसलेही श्रेय घ्यायचे नाही, माझ्या कामगारांना न्याय मिळावा यासाठी माझा लढा आहे.
वाचा :- पुन्हा कंगनाची जीभ घसरली; ठाकरेंवर साधला निशाणा
कोरोनाच्या संकटात त्यांना वेठीस धरले जाऊ नये यासाठी हा विषय आता इथेच संपवा. कामगारांना त्यांच्या मजुरीत किमान 21 रूपयांच्या पुढे दरवाढ मिळावी, अशी अपेक्षा आहे. कामगारांनी आता थांबू नये ऊसतोडीसाठी कारखान्याकडे निघावे, असेही त्यांनी म्हटले आहे.ऊसतोड कामगारांच्या मजुरी संदर्भामध्ये वेगवेगळ्या संघटनेने यापूर्वीच वेगळ्या मागण्या केल्या आहेत. मात्र, पंकजा मुंडे या ऊसतोड कामगारांच्या प्रतिनिधी म्हणून या लवादामध्ये काम करत असल्यामुळे त्यांच्या निर्णयाची वाट ऊसतोड कामगार पाहत होते.
वाचा :- फडणवीस कोरोना पॉझिटिव्ह; उपचारासाठी सरकारी रुग्णालयात दाखल!