राजकारण

‘मुख्यमंत्री घरात बसतात आणि शरद पवार राज्यात फिरतात, याचा अर्थ काय?’

अहमदनगर: ‘करोना रोखण्यात राज्य सरकार अपयशी ठरले आहे. मात्र, देशाचे नेते शरद पवार सांगतात, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्याचे कॅप्टन आहेत. पण कॅप्टन काही घराबाहेर पडत नाही आणि कॅप्टनला बाहेर फिरू देखील दिले जात नाही. शरद पवार मात्र स्वत: या वयातही जिल्ह्याजिल्ह्यात फिरतात. या सर्वामागे असा हेतू दिसतोय की शिवसेना संपवायची व राष्ट्रवादीची ताकद वाढवायची आणि तसाच प्रयत्न राष्ट्रवादीकडून केला जातोय,’ अशी घणाघाती टीका माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांनी केला.

नगर तालुक्यातील खडकी येथील एडीसीसी बँकेत झालेल्या एका कार्यक्रमानंतर ते बोलत होते. यावेळी त्यांनी राज्यातील करोना स्थितीवरून राज्य सरकारवर हल्ला चढवला. ते म्हणाले, ‘करोना परिस्थिती हाताळण्यात राज्य सरकार हे प्रत्यक्षात अपयशी ठरले आहे. हे मी नाही तर सर्वसामान्य जनता देखील बोलत आहे. रुग्णांना बेड उपलब्ध होत नाही. ऑक्सिजन उपलब्ध होत नाही.

आयसीयूची व्यवस्था नाही. मेडिसिन वेळेवर मिळत नाही. लाखो रुपये हॉस्पिटलला द्यावे लागतात. हे सर्व पाहता करोना परिस्थिती हाताळण्यात सरकार अपयशी ठरल्याचे पाहण्यास मिळते. दुसरीकडे देशाचे नेते शरद पवार सांगतात उद्धव ठाकरे हे राज्याचे मुख्यमंत्री कॅप्टन आहेत. कॅप्टन काही घराबाहेर पडत नाही. त्यांना फिरू दिले जात नाही, आणि पवार साहेब मात्र या वयामध्ये जिल्ह्याजिल्ह्यात फिरतात. त्याच्यामागे असाही हेतू दिसतोय की, राज्यातील शिवसेना संपवायची व राष्ट्रवादीला ताकद कशी मिळेल एवढाच प्रयत्न राष्ट्रवादीकडून केला जात असल्याचे पाहण्यास मिळतय,’ असेही त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, नगर महापालिका स्थायी समिती सभापती निवडीच्या वेळी भाजपचे नगरसेवक मनोज कोतकर हे राष्ट्रवादीत गेले. त्यानंतर भाजपच्या आणखी नगरसेवक आमच्या संपर्कात असल्याचा दावा राष्ट्रवादीकडून करण्यात आला होता. मात्र त्यालाही माजी मंत्री कर्डिले यांनी प्रत्युत्तर दिले होते.त्यावेळी राज्यात लवकरच भाजपचे सरकार येणार असून राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेसचे काही नगरसेवक आमच्या संपर्कात आहेत, असे ते म्हणाले होते. त्यानंतर आता त्यांनी राष्ट्रवादीकडून शिवसेना संपवण्याचा डाव सुरू असल्याची टीका केली असून त्याची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा सुरू झाली आहे.