राजकारण

हाथरस प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची घोषणा

नवी दिल्ली : हाथरस प्रकरणानं देश ढवळून निघालाय. प्रशासनाकडून पीडित कुटुंबीयांना दिलेल्या वागणुकीवरून या प्रकरणाचं गूढ आणखीनच वाढलं. पीडित मुलीवर बलात्कार झालाच नसल्याचा दावा उत्तर प्रदेशचे अपर पोलीस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) प्रशांत कुमार यांनी केला. त्यामुळे, एकूणच प्रकरणाच्या तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं. मात्र, आता मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या प्रकरणाच्या सीबीआय चौकशीचे आदेश दिले आहेत. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या कार्यालयाकडून ही माहिती देण्यात आलीय.

शुक्रवारी जनतेच्या रोषामुळे उत्तर प्रदेश सरकारकडून पोलीस अधीक्षकांसह पाच अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आलं होतं. बलात्कार-हत्या व तरुणीच्या पार्थिवावर परस्पर अंत्यसंस्कार करण्याप्रकरणी चौकशी समितीने या पोलिसांच्या निलंबनाची शिफारस केली होती. तसंच हाथरससाठी नव्या अधीक्षकाची नियुक्ती करण्यात आली. खुद्द मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीच ही कारवाई केल्याचं सांगितलं जातंय. तसंच, ‘महिलांच्या सन्मानाला धक्का लावण्याचा विचार करणाऱ्यांचाही गय केली जाणार नाही. उत्तर प्रदेशातील महिलांच्या स्वाभिमानाला धक्का लावण्याचा विचार जरी कोणी केला, तरी त्याचा विनाश अटळ आहे, भविष्यात कोणीही असे कृत्य करण्यास धजावणार नाही, अशी शिक्षा त्या व्यक्तींना केली जाईल. माता आणि लेकींच्या सुरक्षेसाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे,’ अशा शब्दांत शुक्रवारी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हाथरस घटनेवर प्रथमच सोशल मीडियावरून प्रतिक्रिया व्यक्त केली होती.

१४ सप्टेंबर रोजी हाथरसमध्ये पीडित मुलीवर सामूहिक बलात्काराची घटना घडली. कुटुंबीयांनी केलेल्या आरोपानुसार, बलात्कारानंतर तरुणीची जीभ छाटण्यात आली होती तसंच तिच्या पाठीचा मणकाही तोडण्यात आला होता. गेल्या सोमवारी (२८ सप्टेंबर) प्रकृती बिघडल्यानंतर तिला दिल्लीच्या सफदरजंग रुग्णालयात हलवण्यात आलं होतं. परंतु, उपचारा दरम्यान २९ सप्टेंबर रोजी पहाटे पीडित मुलीनं अखेरचा श्वास घेतला. फॉरेन्सिक सायन्स लॅबच्या रिपोर्टमध्येही पीडितेवर बलात्कार झाल्याचे पुरावे आपल्याला मिळाले नसल्याचंही म्हणत अतिरिक्त पोलीस महासंचालकांनी नवा वाद उभा केला होता.