क्राईम

अंत्यसंस्कार झालेत ती आमची मुलगी नाही’, पीडित कुटुंबीयांचा गंभीर आरोप

उत्तर प्रदेशातल्या हाथरस अत्याचार प्रकरणाने आता गंभीर वळण घेतले आहे. या प्रकरणावरून पोलिसांनी जी भूमिका घेतली त्याबद्दल देशभर प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. सर्व गावाची पोलिसांनी नाकेबंदी केली होती. त्यानंतर शनिवारी सकाळी अखेर माध्यमांना गावात जाण्याची परवानगी देण्यात आली. पोलिसांनी ज्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केलेत ती आमची मुलगी नव्हतीच असा दावा पीडित कुटुंबीयांनी केला आहे. या प्रकरणाची सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांकडून चौकशी करावी अशी मागणीही त्यांनी केली आहे.

या प्रकरणात राज्य सरकारने SITचं गठण केलं असून ते तपास करत आहेत. मात्र या किंवा CBI चौकशीवर आमचा विश्वास नाही असंही कुटुंबीयांनी म्हटलं आहे. या प्रकरणात पोलिसांवरही कडक कारवाई करावी अशी मागणीही त्यांनी केली.

पीडितेच्या कुटुंबाने हाथरसचे जिल्हाधिकारी प्रवीण लक्षकार  यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. प्रवीण लक्षकार यांनी पीडितेच्या कुटुंबीयांना बेदम मारहाण केली आणि त्यांच्याकडून मोबाईल फोन हिसकावून घेतले.

पीडितेचा भाऊ पोलिसांचा पहारा चुकवून प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधीपर्यंत पोहोचला. शेतातून लपत-छपत हा मुलगा प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना येऊन भेटला. त्यावेळी त्याने सांगितले की, ‘पोलिसांनी आमच्याकडून मोबाइल फोन हिसकावून घेतले. घरातून कुणालाही बाहेर येण्यास मनाई केली आहे.

आमचे कुटुंबीय माध्यमांशी बोलू इच्छत आहे. पण, घरातून आम्हाला बाहेर येता येत नाही. पोलिसांनी घराबाहेर कडक बंदोबस्त ठेवला आहे. घरासमोर, रस्ते, शेतात पोलीस तैनात करण्यात आले आहे. याला विरोध केला असता डीएम प्रवीण लक्षकार यांनी पीडितेच्या वडिलांच्या लाथ मारली होती. त्यामुळे ते बेशुद्ध पडले होते. त्यानंतर सर्वांना घरात बंद करण्यात आले.