बीड

फणडवीस आणि मी काही शत्रू नाही; भेटीनंतर संजय राऊत यांचे मोठं विधान

मुंबईःसंजय राऊत यांनी शनिवारी अचानक माजी मुख्यमंत्री व भारतीय जनता पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस यांची येथे एका पंचतारांकित हॉटेलमध्ये भेट घेतल्याने राज्याच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली व विविध चर्चांना उधाण आले. अखेर ही भेट सामनाच्या मुलाखतीसाठी झाल्याचा खुलासा भाजपने केल्यानंतर या चर्चांना तूर्तास विराम मिळाला आहे. संजय राऊत यांनीही या भेटीवर भाष्य केलं आहे.

शनिवारी दुपारी फडणवीस-राऊत यांची ग्रँड हयात या हॉटेलमध्ये भेट झाल्याची चर्चा अचानक समाजमाध्यमांवर सुरू झाली. त्या भेटीमध्ये नक्की काय घडले, येथपासून ते राज्यातील आघाडीचे सरकार पडणार का, येथपर्यंतच्या चर्चा रंगल्या. अखेर भाजपने संध्याकाळी या भेटीचं कारण स्पष्ट केलं आहे. संजय राऊत यांनीही या भेटीचं स्पष्टीकरण दिलं आहे.

‘मी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत काही मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी भेट घेतली होती. ते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. तसंच. विरोधीपक्ष नेते आणि बिहार भाजप प्रभारी आहेत. फणडवीस आणि मी काही शत्रू नाही,’ असं स्पष्टीकरण संजय राऊत यांनी दिलं आहे. तसंच. ‘आमच्या भेटीची कल्पना मुख्यमंत्र्यांना होती,’ असंही ते म्हणाले.

आता एनडीए राहिली नाही

‘अकाली दलाच्या बादल यांनी एनडीएतून बाहेर पडणं दुःखद. आम्ही सर्वजण जुने सहकारी आहोत. सत्ता नसतानाही सेना- अकाली दल भाजपसोबत होते. शिवसेनेला एनडीएतून बाहेर पडावं लागलं आता अकाली दलही एनडीएतून बाहेर आहे. एनडीएला आता नवीन सहकारी मिळाले आहेत. माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत. पण, ज्या युतीमध्ये शिवसेना आणि अकाली दल नाही त्या युतीला मी एनडीए मानत नाही,’ असं रोखठोक मत संजय राऊत यांनी व्यक्त केलं आहे. त्याचबरोबर, ‘आम्ही अजूनही पंतप्रधान मोदींना नेता मानतो,’ असंही राऊत यांनी म्हटलं आहे.