बीड

भाजप आणि संघाच्या इशाऱ्यावर काम करतेय शिवसंग्राम

बीडः मी मराठा आरक्षणाच्या विषयात केंद्र आणि राज्य अशा दोन्ही सरकारच्या विरोधात भूमिका घेतली, पण भाजप आणि संघाच्या विरोधात बोलल्यामुळे मला प्रदेशाध्यक्ष पदावरुन काढण्यात आले. शिवसंग्राम भाजप आणि संघाच्या इशाऱ्यावर काम करत असून शिवसंग्रामला स्वतःचा अजेंडा राहिलेला नाही अशी टिका शिवसंग्रामच्या विद्यार्थी आघाडीचे माजी प्रदेशाध्यक्ष अविनाश खापे यांनी केली.


मराठा आरक्षणाला राज्य आणि केंद्र सरकार दोघेही जबाबदार आहेत अशी भूमिका शिवसंग्राम विद्यार्थी आघाडी प्रदेशाध्यक्ष अविनाश खापे यांनी घेतली होती, त्यानंतर शिवसंग्रामने त्यांना पदावरुन काढले होते.


यानंतर खापे यांनी बीडमध्ये पत्रकार परिषद घेऊन शिवसंग्राम संघ आणि भाजपच्या इशाऱ्यावर काम करत असल्याचे म्हटले आहे. भाजप आणि संघ दोघेही मराठा समाजाला आरक्षण देऊ इच्छित नाहित, मी हेच बोलत आहे. शिवस्मारकाचं काय झालं हे विचारत आहे, पण समाजासाठी भाजप विरोधात बोललेलं शिवसंग्रामला खपत नाही. शिवसंग्रामने या सरकारच्या विरोधात आंदोलन केल्यावर भाजपवाले फुले उधळतात असा आरोपही खापे यांनी केला, तसेच शिवसंग्रामला भाजपमध्ये विलीनीकरणासाठी खापे यांनी शुभेच्छा देखील दिल्या. आ. विनायक मेटेंसाठी हा घरचा आहेर आहे.