मराठा आरक्षणाच्या चर्चेसाठी मोदींकडून विलंब? संभाजीराजे उत्तराच्या प्रतीक्षेत
मुंबई, 24 सप्टेंबर : सर्वोच्च न्यायालयाने मराठी आरक्षणात तात्पुरती स्थगिती दिल्यानंतर ठाकरे सरकारवर विरोधकांनी निशाणा साधला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राज्यव्यापी आंदोलन करण्याचा इशारा मराठा समाजाकडून देण्यात आला आहे.
दरम्यान खासदार संभाजी राजे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन दोन पत्रे पाठवली आहेत. मात्र अद्याप त्याचे उत्तर आले नसल्याचे संभाजी राजेंनी सांगितलं. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन संभाजी राजे आक्रमक झाले आहेत. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन संभाजी राजेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र पाठवले आहेत. आतापर्यंत तीनवेळा त्यांना पत्र पाठविण्यात आले असून अद्याप त्याचं उत्तर आलेलं नाही. या पत्रावर राज्यातील सर्वपक्षीय खासदारांच्या सह्या होत्या. याबाबत टीव्ही नाईन मराठीने वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
मराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडणाऱ्या अटॉर्नी जनरलबाबतचा निर्णय सरकारने घ्यायला हवा. अटॉर्नी जनरलाचा निर्णय आणि सरकारचा निर्णय हा एक असायला हवा. कारण अटॉर्नी जनरल हा सरकारचा माणूस आहे, असे संभाजी राजे छत्रपती यांनी सांगितले.
मंत्रिमंडळ बैठकीत काय झाले?
मराठा आरक्षणाचा विषय कोर्टात अडकल्याने राज्य सरकारने मराठा समाजासाठी मंगळवारी महत्त्वाचे निर्णय घेतले. त्यासाठी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत काही मुद्यांवर मंत्र्यांमध्ये मतभेद झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मराठा नेते विरुद्ध OBC नेते असे मतभेद निर्माण झाले आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना निर्णय घेतांना जास्त काळजी घ्यावी लागणार आहे. हा विषय संवेदनशील असल्याने आणि दोनही समाजाची संख्या ही मोठा असल्याने सरकारला प्रत्येक पाऊल जपून टाकावं लागेल असं मत राजकीय निरीक्षकांनी व्यक्त केलं आहे.