राजकारण

पोलीस अधिकाऱ्यांबाबत विधानावरून फडणवीसांचा गृहमंत्र्यांवर घणाघात

नागपूर, 21 सप्टेंबर : राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी काही अधिकाऱ्यांनी ठाकरे सरकार पाडण्याचा प्रयत्न केला होता, असं वक्तव्य केले होते. त्यांच्या वक्तव्यावर भाजपचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस सडकून टीका केली. ‘आपल्याच पोलीस अधिकाऱ्यांवर असा अविश्वास दाखवणे योग्य नाही, जर दुसरं कुणी बोललं तर महाराष्ट्राचा अपमान होतो’ असा टोला फडणवीसांनी देशमुखांना लगावला.

नागपूरमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांनी शेती विधेयकावर भाजपची भूमिका स्पष्ट केली. तसंच महाविकास आघाडी सरकार आणि गृहमंत्री अनिल देशमुखांच्या विधानावर भाष्य केले.

‘अनिल देशमुख यांनी आपल्या पोलिसांवर वक्तव्य केले आहे. त्यामुळे आपल्याच पोलिसांवर आजवर इतका अविश्वास कुणीच दाखवला नाही. अनिल देशमुख यांच्या बोलण्याचा तसा अर्थ निघतो. पण जर दुसऱ्या कुणी पोलिसांवर बोललं तर महाराष्ट्राचा अपमान होतो, असं म्हणणे योग्य नाही. त्यामुळे त्यांनी तोलून मापून बोललं पाहिजे.’ अशी टीका फडणवीसांनी केली.

तसंच, ‘पोलीस हे कुठल्याही पक्षाचे नसता. आम्ही सत्तेवर येण्याआधी 15 वर्ष आघाडी सरकार होते. तेच पोलीस होते, त्याच पोलिसांनी सोबत घेऊन आम्ही उत्तम काम करण्याचा प्रयत्न केला. काही ठिकाणी त्यांना अधिकार आहे. शेवटी सरकार जे सांगते ते पोलिसांना ऐकावे लागते. त्यानुसार पोलीस काम करत असता. पण काही ठिकाणी त्यांना पूर्ण अधिकार आहे.’ असंही फडणवीस यांनी सांगितले.

त्याचबरोबर, ‘टेलीफोन टॅपिंगचे अधिकार आमचे सरकार असताना माझ्याकडे होते. पण, महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर गृहमंत्र्यांनी ते अधिकार आपल्याकडे घेतले. पण सर्वोच्च न्यायालयाने आता नियम करून दिले आहे, कोणतीही व्यक्ती यात हस्तक्षेप करू शकत नाही. माझ्याही काळात नाही आणि आताच्याही काळात करू शकत नाही. याचे संपूर्ण अधिकार हे मुख्य सचिव आणि  अप्पर सचिवांना देण्यात आले आहे.  ते कधीही मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना अधिकार घेता येत नाही. जर असं असेल तर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन होईल, असा सल्लाही फडणवीस यांनी ठाकरे सरकारला दिला.

तसंच, शेती विधेयकाला विरोध करणारे बेनकाब  होणार  आहे. सगळ्या टास्क फोर्सने या कायद्याच समर्थन केले आहे. शिवसेना हा  कन्फुज पक्ष आहे.  ते लोकसभेत वेगळं बोलतात विधानसभेत वेगळं बोलतात. आधी त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी. शेतकरी आत्महत्या करणार नाही याची गॅरंटी त्यांनी घेतली पाहिजे, कारण त्यांचं सरकार आहे, असा सल्लावजा टोलाही फडणवीस यांनी संजय राऊत यांना लगावला.