News

मराठा समाजानंतर आता धनगर समाजही आरक्षणासाठी रस्त्यावर, सरकारला दिला गंभीर इशारा

औरंगाबाद, 21 सप्टेंबर : राज्यात एकीकडे कोरोनाचा हाहाकार माजला असताना दुसरीकडे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन वातावरण तापलं आहे. अशात आता मराठा आरक्षणा पाठोपाठ धनगर समाजाच्या आरक्षणासाठीही धनगर समाजानेही मोर्चे बांधणी करण्यास सुरुवात केली आहे. आज औरंगाबाद धनगर समाजाच्या कोर कमिटीची बैठक घेण्यात आली. या बैठकीत राज्य सरकारला गंभीर इशारा देण्यात आला आहे.

औरंगाबाद धनगर आरक्षण विभागीय बैठकीत आघाडी सरकारचा जाहीर निषेध करण्यात आला. धनगर आरक्षण प्रश्न तात्काळ सोडावा अन्यथा मंत्रालयामध्ये आणि मंत्र्यांच्या घरात मेंढर घुसणार असल्याचा इशारा धनगर समाजाचे नेते भारत सोन्नर यांनी दिला आहे. त्यामुळे राज्यात आरक्षणाचा मुद्दा आता पेटताना दिसत आहे.

मराठा समाजानेही आरक्षणासाठी तीव्र आंदोलनाला सुरुवात केली आहे. सोलापूरमध्ये सुरू असलेल्या बंदला गालबोट लागल्याची माहिती समोर येत आहे. सोलापुरातील एटीएम सेंटरवर दगडफेक करण्यात आली आहे. दगडफेकीत ब्रह्मदेव माने सहकारी बॅंकेच्या एटीएमवर दगडफेक करत आंदोलन चिघळवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील एटीएमची तोडफोड केली केली. सकल मराठा क्रांती मोर्चाने सोलापूर बंद पुकारला होता. पण त्याला आता तीव्र वळण लागल्याचं पाहायला मिळालं आहे. सोलापूरमध्ये तर पहिली जिल्हांबदीही करण्यात आली आहे. मराठा समाजाच्या संघटनांनी आज सोलापूर जिल्हा बंदची हाक दिली आहे. मात्र आज पहाटे पासून माढा, निमगाव पाटी इथं मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. इतकंच नाही तर पंढरपूर-पुणे मार्गही आंदोलकांनी रोखला आहे.